विद्याधर पुरंदरे, सचिव, सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (एसईएपी)
डॉ. आनंद देशपांडे हे नाव समोर आले, की पुण्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात स्वकर्तृत्वाने उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व दिसते. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीच्या पर्सिस्टंट कंपनीचे ते संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक. त्यांनी पुण्यातून १९९० मध्ये या कंपनीची सुरुवात केली. कंपनीतील कर्मचारी असोत, मित्र असोत, की सामाजिक वर्तुळातील व्यक्ती; प्रत्येकाला त्यांच्याबद्दल एक आपलेपणाची भावना वाटते. त्यामुळे हे लोक त्यांच्याबद्दल मनमोकळेपणाने तासन् तास बोलू शकतात. अगदी मोजक्याच व्यवसायांचा गाभा हा नैतिकतेला धरून असतो. हे तत्त्व पाळून कर्मचारी कल्याणाला महत्त्व देणारी पर्सिस्टंट बहुधा एकमेव कंपनी असावी. हे सर्व घडले आहे ते सुरेश पी. देशपांडे (सहसंस्थापक) आणि डॉ. आनंद देशपांडे (संस्थापक) या पिता-पुत्रांमुळे. एखादा चित्रपटाला लाजवेल असा त्यांचा ध्येयपूर्ती आणि यशाचा प्रवास आहे. हा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा योग मला आला.
आनंद यांचा जन्म अकोला जिल्ह्यात झाला. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या निवासी वसाहतीत ते वाढले. शालेय शिक्षणानंतर ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु, त्यांनी खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) प्रवेश घेतला. आयआयटीनंतर त्यांनी अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथे त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी मिळविली. त्यानंतर आनंद यांना एचपी लॅब्जमध्ये नोकरीची संधी मिळाली. तिथे उमेदवारी करीत असताना त्यांच्या मनात कायम भारतात परतून स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे विचार सुरू होते.
हेही वाचा… वर्धानपनदिन विशेष : पुण्याच्या विकासासाठी नागरी संघटना हवी
याच सुमारास केंद्र सरकारने अमेरिकेतील भारतीयांशी संपर्क साधण्याची मोहीम हाती घेतली. त्या वेळी इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सचिव एन. विठ्ठल हे अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी तेथील भारतीयांशी चर्चा करून भारतात संधी शोधण्याचे आवाहन केले. ही बाब आनंद यांच्या पथ्यावरच पडली. त्या वेळी त्यांचे वडील पुण्यात एका खासगी कंपनीत काम करीत होते. त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू करण्याबाबत वडिलांकडे विचारणा सुरू केली. हे सर्व सुरू असताना सरकारी पातळीवरही सकारात्मक पावले पडत होती. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने देशात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या निर्मितीची (एसटीपीआय) योजना सुरू केली. यामुळे १९९० मध्ये देशातील सॉफ्टवेअर विकास व्यवसायाचे स्वरूप आमूलाग्र बदलण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिला सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क पुण्यात भोसरी येथे सुरू झाला.
आनंद हे अमेरिकेत असताना त्यांच्या वडिलांनी मे १९९० मध्ये पर्सिस्टंट सिस्टीम्सची स्थापना पूर्णत्वास नेली. त्यांच्या वडिलांनी एसटीपीआय अंतर्गत पर्सिस्टंटची नोंदणी केली. त्यानंतर कंपनीचे कार्यालय सुरू करण्यासाठी जागा मिळण्याची प्रतीक्षा होती. त्या वेळी एसटीपीआयमधील सर्व कंपन्यांमध्ये केवळ पर्सिस्टंटच्या हातात नवीन प्रकल्प होता. यासाठी आनंद आणि त्यांचे पिता असे दोघेही प्रयत्न करीत होते. आनंद यांनी एन. विठ्ठल यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची दिल्लीत भेट घेतली. (त्या वेळी पुण्याहून दिल्लीला विमानसेवा आठवड्यातून केवळ एकदा असे) या भेटीनंतर पर्सिस्टंटला ३०० चौरस फुटांचा गाळा एसटीपीआय अंतर्गत मिळाला. अशा पद्धतीने एसटीपीआयमधील पहिली कंपनी म्हणून पर्सिस्टंटची सुरुवात झाली.
हेही वाचा… वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’
आधी इंडियाना विद्यापीठात आनंद यांच्या मित्राने त्यांच्यासमवेत एका व्यवसाय अनुदानासाठी अर्ज केला होता. आनंद हे भारतात परत येण्याच्या तीन महिने आधी या दोघांना ५० हजार डॉलरचे सरकारी अनुदान मिळाले. त्यातून मित्राने अमेरिकेतच कंपनी सुरू करण्याचे पाऊल उचलले. मात्र, आनंद यांनी भारतात काम करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांना पहिला प्रकल्प मिळाला. याचप्रकारे एचपी लॅब्जमध्ये फ्रेंच उद्याोगपती फ्रान्स्वा बँसीलहॉन हे त्या वेळी कार्यरत होते. आनंद आणि ते एकाच लॅबमध्ये काम करीत होते. त्या वेळी दिलेला शब्द बँसीलहॉन यांनी पाळला आणि आनंद यांना दुसरा प्रकल्प मिळाला.
मागील तीन दशकांत पर्सिस्टंटची सातत्याने वाढ होत आहे. तीनशे चौरस फूट जागेत आणि पाच कर्मचाऱ्यांसह सुरू झालेली कंपनी आता देशातील १० राज्ये आणि जगातील १९ देशांमध्ये विस्तारली आहे. कंपनीचे मनुष्यबळ आता २३ हजारांवर आहे. आनंद यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनी या उंचीवर पोहोचू शकली आहे. कंपनीचे नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे कंपनीचा महसूल आता एक अब्ज डॉलरवर आणि बाजारमूल्य ८.१ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.
हेही वाचा… वर्धानपनदिन विशेष : पीआयसी, देशविकासाचा सोबती
आनंद यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. ते पहिल्या पिढीतील स्वयंउद्याोजक असण्यासोबत उत्तम वक्ते, समाजासाठी झटणारे सजग नागरिक आणि दानशूरही आहेत. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यातून त्यांनी नेहमीच स्वयंउद्याोजक आणि अनेक कंपन्यांना पाठबळ दिले आहे. विविध क्षेत्रांतील स्वयंउद्याोजकांना मार्गदर्शन ते आवडीने करतात. ते पर्सिस्टंट फाउंडेशनचे संस्थापक-विश्वस्त आहेत. याचबरोबर अनेक व्यावसायिक आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यात नॅसकॉम कार्यकारी मंडळ, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरी (एसीएम), सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (एसईएपी), पुणे चॅप्टर ऑफ कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) आणि सीआयआय पुणे झोनल कौन्सिल, कॉम्प्युटर हिस्टरी म्युझिअम, इंडियन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स इंडस्ट्री राउंड टेबल, आयफोरसी, स्कूल ऑफ इन्फॉर्मेटिक्स, कॉम्प्युटिंग अँड इंजिनिअरिंग ऑफ इंडियाना युनिव्हर्सिटी आदी संस्थांचा समावेश आहे.
आनंद हे नेहमी काळाच्या पुढे विचार करतात. त्यामुळेच त्यांनी २०१३ मध्ये देशासमोरील महत्त्वाचा प्रश्न ओळखला. हा प्रश्न होता रोजगारनिर्मितीचा. जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती करून हा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकली. त्यातूनच सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि लघु स्वयंउद्याोजकांना आनंद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाठबळ देण्यास सुरुवात केली. रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा, असा त्यांचा मंत्र होता. त्यातून ‘देआसरा’चा जन्म २०१३ मध्ये झाला. ही स्वयंसेवी संस्था स्वयंरोजगार वाढविणे आणि सूक्ष्म, अतिसूक्ष्म, लघु स्वयंउद्याोजकांना पाठबळ देण्यासाठी सुरू झाली. ‘देआसरा’ हे मराठी नाव असून, देशपांडे आडनाव आणि कुटुंबातील सदस्य आनंद, सोनाली, रिया आणि अरूल यांची आद्याक्षरे वापरण्यात आली आहेत. या संस्थेकडून यशस्वी उद्याोजक हे ऑनलाइन नियतकालिक चालविले जाते. त्यात यशस्वी स्वयंउद्याोजकांच्या कथा, व्यवसायाबाबत सूचना आणि तज्ज्ञांचा सल्ला दिलेला असतो. देआसराकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून ‘देआसरा’ मागील दशकभरात २.५ लाख स्वयंउद्याोजकांपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) आनंद हे हंगामी सदस्य असून, व्हीएलडीबी फाउंडेशनचे विश्वस्त आहेत. भारतातील कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी विदा मंच तयार करण्यासाठी ते काम करीत आहेत. आनंद यांच्या रूपाने पुण्यात एक दूरदृष्टी असलेले तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व मिळाले आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील आयटी उद्याोगावर त्यामुळेच त्यांचा अमीट ठसा आहे.