पुणे : ‘उद्योजकाने कायमच बाजाराचे नेतृत्व करण्याचा, ‘मार्केट लीडर’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाजारावर वर्चस्व मिळवायला हवे. त्यानंतर व्यवसाय विस्तारता येतो. कर्मचारी आणि काम वाढवता येते,’ असे मत प्रसिद्ध उद्योजक डॉ. आनंद देशपांडे यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘साकेत प्रकाशना’च्या वतीने देशपांडे यांच्या हस्ते ‘ॲन इंजिनियर्स जर्नी टू आंतरप्रेन्योरशिप’ या ‘अ अभियंत्याचा’ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. उद्योजक मनीष गुप्ता, लेखक राजेश मंडलिक, अनुवादक सदानंद बेंद्रे, संपादक गौरी साळवेकर, प्रकाशक प्रतिमा भांड, डॉ. वैभवी मंडलिक या वेळी उपस्थितीत होत्या. याच कार्यक्रमात उद्योजक बापू कदम, नितीन बोऱ्हाडे आणि मनीषा पाठक यांना सन्मानित करण्यात आले.
देशपांडे म्हणाले,‘नेतृत्व, चांगली टीम आणि आदर्श कार्यपद्धती तीन गोष्टींवर उद्योजकांनी सातत्याने काम करायला हवे. एकाचवेळी अनेक गोष्टी न करता एकाच उत्पादनावर लक्ष दिल्यास, तुमची शक्ती एकाच ठिकाणी खर्च होते. मात्र, ती एक गोष्ट ठरविण्यासाठी बाजारपेठेची सखोल माहिती करून घ्यायला हवी.’
‘उद्योगात सगळा व्यवहार उद्योजकाभोवती केंद्रीत असतो. मात्र, चांगल्या ‘टीम’शिवाय उद्योगातही यश मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीला काम करण्याचे स्वातंत्र्य आणि मोकळीक, कामासाठी प्रवृत्त करणारे ध्येय, आदर्श कार्यपद्धती आणि काम करणाऱ्या, काम देणाऱ्या लोकांचा विश्वास, या चार गोष्टी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहेत. तज्ज्ञ, विश्वासू ‘बोर्ड मेंबर’ व्यवसायाच्या यशात मोठा वाटा उचलतात. व्यवसाय वाढवण्यासाठी ‘माझी कंपनी’ ते ‘आपली कंपनी’ असे स्थित्यंतर गरजेचे असते,’ असे देशपांडे म्हणाले.
गुप्ता म्हणाले,‘उद्योग उभारण्यासाठी आपल्या क्षमता ओळखून प्रामाणिकपणे काम करायला हवे. नव्याने सुरू केलेला कोणताही उद्योग स्वतःच्याच कष्टातून सुरू केला जातो. त्यासाठी प्रेरणा महत्वाची असते. मात्र, उद्योगाच्या दुसऱ्या टप्प्यात सांघिक कामगिरी उंचावणे आणि योग्य माणसांची निवड महत्त्वाची असते. उद्योजकामध्ये ती स्पष्टता असावी लागते. त्यापुढे व्यवसाय विस्तारण्यासाठी केवळ प्रेरणा आणि स्पष्टता असून चालत नाही, तर योजनांची अंमलबजावणी निर्णायक ठरते. व्यवसायात प्रेरणा, स्पष्टता आणि अंमलबजावणी या तिन्हींचा संगम साधता यायला हवा.’
भांड यांनी प्रास्ताविक केले. साळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंडलिक यांनी आभार मानले.