लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय शिक्षण मंडळ (भारतीय एज्युकेशन बोर्ड) या संस्थेला देशव्यापी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, हरिद्वार स्थित ही संस्था योगगुरू रामदेव बाबा यांची आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. देशभरात राज्य सरकारांच्या अखत्यारितील राज्य शिक्षण मंडळे, राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ, सीबीएसई, सीआयसीएसई अशा शिक्षण मंडळांशिवाय आता आता भारतीय शिक्षण मंडळ या शिक्षण मंडळाची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय… नेमके होणार काय?

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून हरिद्वार येथील भारतीय शिक्षण मंडळाचा राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळांमध्ये समावेश केल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, असे यूजीसी आणि एआयसीटीईच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर भारतीय विद्यापीठ महासंघाने (एआययू) शिक्षण मंडळाला ऑगस्ट २०२२मध्ये देशभरातील शिक्षण मंडळांसह समकक्षता दिली आहे. तसेच देशातील नियमित शिक्षण मंडळ म्हणून मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा समकक्ष ठरवल्या आहेत. त्यामुळे भारतीय शिक्षण मंडळाला देशव्यापी शिक्षण मंडळ म्हणून ग्राह्य धरावे, असेही एआयसीटीईच्या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिक्षण मंडळाला राष्ट्रीय मंडळ म्हणून फेब्रुवारी २०२३मध्ये मान्यता दिली. तसेच भारतीय शिक्षण मंडळाला देशातील शिक्षण मंडळांच्या परिषदेचे (सीओबीएसई) सदस्यत्व जानेवारी २०२३मध्ये देण्यात आले. तर अखिल भारतीय विद्यापीठ महासंघातर्फे (एआययू) भारतीय शिक्षण मंडळाला अन्य राष्ट्रीय, राज्य मंडळांप्रमाणे समकक्षता ऑगस्ट २०२२मध्ये देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.