पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रवाशांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहने दीर्घ काळ थांबल्यास अद्ययावत ‘स्वयंचलित प्रणाली’चा (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन, एएनपीआर) अवलंब करण्यात येणार आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने जुन्याच पद्धतीने या वाहनांवर कारवाई होत आहे. ही कारवाई पुरेशी ठरत नसल्याने समस्या कायम आहे.

पुणे विमानतळावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. अनेक प्रवासी विमानतळावर सहज आणि वेळेत पोहचण्यासाठी किंवा विमानातून उतरल्यानंतर नियोजित ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन किंवा कॅबचा अवलंब करतात. विमानतळ प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार अशा वाहनांसाठी कालमर्यादा निश्चित आहे. त्यापेक्षा अधिक काळ वाहने थांबली, तर अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने परिसरात चार ते पाच कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र, हे कर्मचारी पुरेसे नसल्याचे चित्र असून, अनेक वाहने प्रवाशांची प्रतीक्षा करीत दीर्घ काळ थांबलेली असतात, अशी माहिती विमानतळावरील काही प्रवाशांनी दिली.

या समस्येच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात येणाऱ्या वाहनांवर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वयंचलित प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई करण्याबाबत प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाला पाठवला आहे. मात्र, या अहवालाला मंजुरी मिळालेली नाही.

टोलवाटोलवी जास्त ?

पुणे विमानतळ परिसरात दीर्घ काळ थांबून अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी चार ते पाच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांनी अशा वाहनचालकांना हटकल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेकदा वाहनचालक आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या आहेत.

नवे-जुने काय ?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार विमानतळ परिसरात खासगी वाहनांसाठी मापदंड निश्चित केले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. जून २०२५ मधील नियमावलीनुसार खासगी वाहनांना १५ मिनिटांची मुभा देऊन त्यापेक्षा जास्त कालावधी थांबल्यास ५०० रुपये दंड स्वयंचलित प्रणालीद्वारे स्वीकारण्याची तरतूद आहे. मात्र, या प्रणालीला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने मनुष्यबळामार्फत दंड आकारला जात आहे. जुन्या पद्धतीनुसार २०१६ मध्ये सात मिनिटांपेक्षा जास्त कालावधी थांबल्यास ८५ रुपये दंड आकारला जात होता. २०१९ मध्ये तीन मिनिटांचा कालावधी आणि ३४० रुपये दंडाची तरतूद होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळ परिसरात खासगी वाहनांवर ‘एएनपीआर’ या स्वयंचलित प्रणालीमार्फत दंड आकारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परंतु, मनुष्यबळामार्फत दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ