scorecardresearch

पुणेकरांना आता गुजरातच्या कंपनीकडून विजेचा पुरवठा? टोरेंट कंपनीकडून वीज आयोगाला अर्ज

टोरेंट कंपनीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज वितरण करण्याचा परवाना मागितला आहे. टोरेंटला परवानगी मिळाल्यास महावितरणबरोबर ही कंपनीही शहरात वीज वितरणात उतरेल.

पुणेकरांना आता गुजरातच्या कंपनीकडून विजेचा पुरवठा? टोरेंट कंपनीकडून वीज आयोगाला अर्ज
मराठवाडा, विदर्भापेक्षा कोकणात वीजचोऱ्या (संग्रहित छायाचित्र)

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर वीज कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यांना मिळालेल्या आश्वासनाचा मुद्दा ताजा असतानाच पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीणमधील काही भागांतील वीज वितरणात उतरण्याची तयारी गुजरातच्या अहमदाबादमधील खासगी कंपनीने केली आहे. टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीने त्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज कायद्यानुसार अर्ज दाखल केला असून तो आयोगाने स्वीकारला आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा– पुणे : पिंपरीत ६ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; चावा घेतल्याने १३ टाके पडले

खासगीकरणाच्या मुद्द्यावर महावितरणमधील कर्मचारी, अभियंते आदींनी नुकतेच संपाचे हत्यार उगारले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपन्यांचे खासगीकरण न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर एकच दिवसात संप मागे घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर टोरेंट कंपनीने पुणे शहर आणि परिसरात वीज पुरवठ्याच्या परवान्यासाठी अर्ज केल्याने त्याबाबत जोरदार चर्चा होत आहे. मुंबई परिसर आणि काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात वीज वितरणाचा परवाना महावितरण कंपनीकडे आहे. मात्र, केंद्रीय वीज कायद्यानुसार महावितरणबरोबरच या क्षेत्रातील खासगी कंपन्यांनाही वीज वितरणाच्या क्षेत्रात परवानगी मिळू शकते. त्यानुसारच टोरेंट पॉवर लिमिटेडने राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज सादर केला आहे.

हेही वाचा- राज्यातील ६६६ सीबीएसई शाळांची तपासणी; बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांकडे तक्रार

वीज नियामक आयोगाने ५ जानेवारीला टोरेंट कंपनीचा अर्ज स्वीकारला आहे. त्यानुसार कंपनीने सूचना प्रसिद्ध केली असून, याबाबत नागरिकांकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. ७ जानेवारीपासून पुढील ३० दिवसांत नागरिकांना सूचना, हरकती महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे मेलद्वारे किंवा आयोगाच्या मुंबई कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविता येणार आहेत.

हेही वाचा- जळगाव, औरंगाबादमध्ये काश्मीरसारखी थंडी; तापमानात मोठी घट झाल्याने परिणाम

टोरेंट कंपनी काय करते?

टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीचे कार्यालय गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहे. कंपनीकडून सध्या गुजरातमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, सुरत अणि दहेज या ठिकाणी वीज वितरण केले जाते. महाराष्ट्रामध्ये भिवंडी, शीळ, मुंब्रा आणि कळवा आदी भागात आणि उत्तर प्रदेशमध्ये आग्रा येथे वितरण फ्रॅचायझी असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या सर्व परिसरातील ४० लाखांहून अधिक वीजग्राहकांना सुमारे १७ अब्ज युनिट वीजपुरवठा करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात हवी डबल डेकर बस

पुण्यात सहा लाखांपुढे ग्राहक उद्दीष्ट

टोरेंट कंपनीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज वितरण करण्याचा परवाना मागितला आहे. सध्या या भागांत महावितरणकडून वीज वितरण करण्यात येते. टोरेंटला परवानगी मिळाल्यास महावितरणबरोबर ही कंपनीही शहरात वीज वितरणात उतरेल. कंपनीचे अर्जात नमूद केल्यानुसार पुणे जिल्ह्यात वीज वितरणाचा परवाना मिळाल्यापासून पाच वर्षांत सहा लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणार असल्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 22:50 IST

संबंधित बातम्या