scorecardresearch

जळगाव, औरंगाबादमध्ये काश्मीरसारखी थंडी; तापमानात मोठी घट झाल्याने परिणाम

राज्यात अनेक भागांत यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भातील बहुतांश भागासह पुणे, नाशिक या शहरांतही थंडी वाढली आहे.

जळगाव, औरंगाबादमध्ये काश्मीरसारखी थंडी; तापमानात मोठी घट झाल्याने परिणाम
तापमानात घट झाल्यामुळे जळगाव, औरंगाबादमध्ये थंडी वाढली (संग्रहित छायाचित्र)

हिमालयामध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरसारख्या विभागातील शहरी भाग थंडीने गारठला आहे. महाराष्ट्रातही ज‌ळगाव आणि औरंगाबादमध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने या भागांतही काश्मीरप्रमाणेच थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे गरम कपडे घातल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील बहुतांश भागासह पुणे, नाशिक या शहरांतही थंडी वाढली आहे.

हेही वाचा- राज्यातील ६६६ सीबीएसई शाळांची तपासणी; बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांकडे तक्रार

राज्यात अनेक भागांत यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये किमान तापमानाचा पारा ५.० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. सरासरीच्या तुलनेत ते तापमान तब्बल ७.३ अंशांनी कमी आहे. औरंगाबाद येथे ५.७ अंश, तर गोंदियामध्ये ७.० अंश किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत तापमानातील फरक लक्षात घेता या भागात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. त्या पाठोपाठ नागपूर आणि यवतमाळ येथे ८.५, परभणीत ९.५, वर्धा आणि अमरावतीत ९.९, पुण्यात ८.६ आणि नाशिक येथे ८.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमानही सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी कमी आहे.

हेही वाचा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात हवी डबल डेकर बस

अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आदी भागांत १० अंश, तर नांदेड, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांत ११ ते १२ अंशांवर तापमान नोंदविले जात आहे.
हिमालयीन विभागामध्ये १० ते १३ जानेवारी या कालावधीत बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी भागांतील तापमानातील घटही काही काळ कायम राहणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका राज्यात दोन-तीन दिवस कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 21:43 IST

संबंधित बातम्या