पुणे : ‘कला म्हणजे ऊर्जानिर्मिती आहे. शास्त्र समजावले जाते, विद्या दिली जाते, तंत्र शिकविले जाते, तर कला-सौंदर्य संस्कारित केले जाते. कला आत्मसात करण्यासाठी भावना शुद्ध हवी. कलेला स्थान नसलेल्या देशात दहशतवाद फोफावताना दिसतो,’ असे मत तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी मांडले. संवाद पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्यातर्फे ‘कला आणि करिअर’ या विषयावरील ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. त्या वेळी पं. तळवलकर बोलत होते.
नृत्यगुरू सुचेता चापेकर, ‘संवाद पुणे’चे सुनील महाजन, ‘हाऊस ऑफ सक्सेस’चे प्रसाद मिरासदार, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, निकिता मोघे, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर या वेळी उपस्थित होते. पं. तळवलकर म्हणाले, ‘कला गुरू-शिष्य, तसेच मौखिक परंपरेतूनच प्रवाहित होते. ही परंपरा जपल्यास कलाकार घडण्यास मदत होते. त्यातून पुढील पिढी कलेच्या क्षेत्राकडे वळते. कला शिकताना आणि शिकविताना विचारांची बैठक महत्त्वाची आहे.’
‘कौशल्यासह बारकावे जाणून घेतल्यास कलेची जोपासना करणे सोपे जाते. कला क्षेत्रात परिपूर्णता आणि अचूकता महत्त्वाची आहे,’ असे डॉ. गोसावी यांनी सांगितले. कलेशी संलग्न विषयांचा विद्यापीठ स्तरावर अभ्यास होणे ही काळाची गरज आहे, असे चापेकर यांनी नमूद केले. तर तंत्रशिक्षणाबरोबरच कला क्षेत्रातील शिक्षणाची आज आवश्यकता असून, त्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत, असे डॉ. चिटणीस म्हणाले.
‘रियाजाकडे दुर्लक्ष करता कामा नये’
उद्घाटनानंतर ‘नृत्य कला आणि करिअर’ या विषयावर ज्येष्ठ नृत्यगुरू शमा भाटे, भरतनाट्यम् नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी प्रा. शारंगधर साठे, भारती विद्यापीठातील नृत्य विभागप्रमुख देविका बोरकर यांनी संवाद साधला. ‘कलाकाराने कलेतून आनंद घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलाकाराला समान संधी उपलब्ध होऊ शकत नाही. रियाजाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यासाठी वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन गरजेचे आहे,’ असे भाटे यांनी सांगितले. तर, नवीन शैक्षणिक धोरणामुळे योग्य मूल्यमापन, सर्वसमावेशक अभ्यासक्रम, वर्गीकरण याविषयी विचार होत आहेत. ज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी रंगभूषा, वेशभूषा, वाद्य, संगीत, शरीरशास्त्र, संवाद कौशल्य यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे महाजन यांनी नमूद केले.