प्रथमेश गोडबोले prathamesh.godbole@expressindia.com
सोसायटय़ा हे पुण्याचे एक वैशिष्टय़ आहे. सोसायटीत राहणारी सर्व कुटुंब एकत्र येऊन अनेक चांगली कामे करत असतात. अनेकविध उपक्रमही सोसायटय़ांमध्ये वर्षभर सुरू असतात. अशा सक्रिय सोसायटय़ांची संख्या पुण्यात मोठी आहे. अशा सोसायटय़ांमधील विविध उपक्रमांची, कार्यक्रमांची, सोसायटय़ांनी सुरू केलेल्या कामांची, सोसायटीतील एकोप्याची ओळख करून देणारे हे नवे सदर.
पुण्याची जी अनेक वैशिष्टय़े आहेत, त्यात सतत काही ना काही भर पडत असते. पुण्यातील सोसायटय़ा हेही पुण्याचे एक नवे वैशिष्टय़ झाले आहे. शहराच्या वाढीचा विचार केला तर सामान्यपणे १९८० च्या दशकात पुण्याची वाढ गतीने सुरू झाली आणि त्यात प्रामुख्याने उपनगरांचा विस्तार झाला. कोथरूड हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. मध्य पुण्यात राहणारे नागरिक जसे फार मोठय़ा संख्येने उपनगरांमध्ये स्थलांतरित झाले तसेच बाहेरगावाहून आणि परराज्यातून नोकरी-व्यवसायासाठी आलेलेही उपनगरांमध्येच राहण्यासाठी आले. त्या काळात उपनगरांमध्ये जागा आणि सदनिका तुलनेने कमी दरात मिळत होत्या. त्यामुळे उपनगरांमध्ये बांधकामेही मोठय़ा गतीने झाली.
साहजिकच पुण्याच्या सर्व बाजूंनी उपनगरे विस्तारत गेली आणि त्यातील सोसायटय़ाही बहरत गेल्या. यातील अनेक सोसायटय़ा आता तीस-चाळीस वर्षांनंतर पुनर्विकासाच्याही प्रक्रियेत आल्या आहेत. एकुणातच सोसायटीचा व्यापक अर्थाने विचार केला तर सोसायटी म्हणजे एक कुटुंब असे जे म्हटले जाते ते खरे आहे. पुण्यातील अनेक सोसायटय़ांमध्ये सोसायटी म्हणजे एक कुटुंब असे वातावरण आजही पाहायला मिळते. शहराच्या वेगवेगळ्या भागातून किंवा परगावाहून वा परराज्यातून आलेली कुटुंब सोसायटय़ांमध्ये गुण्यागोविंदाने राहताना दिसतात. अनेक वर्षे एकाच इमारतीत किंवा अनेक इमारतींच्या एकाच संकुलात राहात असल्यामुळे या कुटुंबांचे परस्परांमध्ये जिव्हाळ्याचेही संबंध निर्माण होतात. नवीन इमारत, नवीन घर, नवीन परिसर आणि त्यात नवीन ओळख. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात, नवीन विचार-आचार यामुळे पुण्यातील अनेक सोसायटय़ा त्यांनी राबवलेल्या संकल्पनेमुळेही ओळखल्या जातात.
अनेक सोसायटय़ांमधील सर्व निवासी मंडळी एकत्र येऊन विविध कार्यक्रम साजरे करतात, सण-समारंभ करतात. त्यातून एकीचे, खेळीमेळीचे वातावरण तयार होते. एकत्र येत राहिल्यामुळे नवनवीन कल्पना मांडल्या जातात. त्या साकारण्यासाठी पुन्हा सगळे एकत्र येतात. कधी सहलीचे निमित्त असते, कधी सोसायटीच्याच आवारात आयोजित केलेला एखादा कार्यक्रम असतो किंवा कधी काही स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमित्त असते. अशाच एकत्र येण्यामुळे अनेक सोसायटय़ांमध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे, थर्माकोल आणि प्लास्टिक मुक्ती, सौर ऊर्जेसारखे किंवा पर्जन्यजल संधारणासारखे प्रकल्प मार्गी लागले आहेत. सोसायटीत निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नागरिकांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. त्याला शहरातील सोसायटय़ांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अनेक सोसायटय़ांनी सोसायटीच्या आवारात झाडे लावून आपले वेगळेपण जपले आहे. या शिवाय कितीतरी समाजोपयोगी कामेही सोसायटय़ांनी यशस्वीरीत्या केली आहेत.
भारतीय संस्कृतीत सण आणि निसर्ग हातात हात घालून येतात. प्रत्येक सणाचा पर्यावरणाशी जवळचा संबंध असतो. स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), महाराष्ट्र दिन (१ मे) या दिवशी राष्ट्रीय ध्वजारोहणासह गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नाताळ, संक्रांत असे विविध सण, उत्सवांमध्ये सोसायटय़ांमध्ये अभिनव उपक्रम राबवण्यात येतात.
सोसायटी म्हटली की कार्यकारिणी आली, पदाधिकारी आले, अध्यक्ष आले, मग वर्गणी आली, देखभाल खर्चाची वसुली आली. हे सर्व ओघाने येतेच. या बाबतीतही सोसायटय़ांमध्ये वैविध्य असते. अनेक सोसायटय़ांनी या प्रक्रियेतही अगदी आदर्शवत ठरावे असे काम केले आहे. त्यात काही जण खूप सक्रिय असतात. सोसायटय़ांचे काही प्रश्नही असतात, काही समस्या असतात. कुठे रस्त्याचा प्रश्न असतो, कुठे अतिक्रमणाचा प्रश्न असतो. ते सोडवण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न सुरू असतात आणि काही सोसायटय़ांमधील मंडळी हे प्रश्न सोडवण्यासाठी कधी अभिनव पद्धतीने आंदोलन करतात, तर कधी एखादा प्रश्न सर्वाना एकत्र आणून स्वप्रयत्नातून सोडवतात. अशा सक्रिय सोसायटय़ांचीही संख्या पुण्यात काही कमी नाही. अनेक सोसायटय़ांनी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक स्वप्रयत्नातून यशस्वीरीत्या केली आहे. या सदरातून विविध सामाजिक, पर्यावरणविषयक अभिनव संकल्पना राबवणाऱ्या सोसायटय़ांची, उपक्रमशील सोसायटय़ांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचेल आणि अधिकाधिक सोसायटय़ा उपक्रमांमध्ये, सामाजिक कामांमध्ये सहभागी होतील याची खात्री आहे.