चित्र पाहताना गालावर खुदकन हसू आणणारी आणि क्षणात अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी, अशा दोन्ही पद्धतीची व्यंगचित्रे तेवढय़ाच समर्थपणे चितारणारे.. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडींवर आपल्या व्यंगचित्रांतून मार्मिक आणि परखड भाष्य करणारे.. व्यंगचित्रांतून तत्त्वचिंतन मांडणारे व्यंगचित्रकार अशीच मंगेश तेंडुलकर यांची खरी ओळख होती. ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक विजय तेंडुलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. सुरेश तेंडुलकर, सजग अभिनेत्री प्रिया तेंडुलकर अशा हरहुन्नरी तेंडुलकर घराण्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेले व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाची बातमी समजताच सारेच हळहळले. प्रत्येकाच्या जीवनाशी एकरूप झालेल्या तेंडुलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती निघून गेली, अशीच प्रत्येकाची भावना होती. ज्येष्ठ बंधू विजय तेंडुलकर यांच्यासाठी आणलेल्या स्केचबुकमध्ये मंगेश यांनी चित्र रेखाटत कलेचे हे वेगळे माध्यम निवडले आणि त्यामध्ये आपली नाममुद्रा उमटवली.

मंगेश तेंडुलकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३६ रोजी पुण्यात झाला. स. प. महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी संपादन केल्यानंतर तेंडुलकर यांनी काही काळ दारूगोळा कारखान्यात (अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी) काम केले. मात्र, व्यंगचित्र रेखाटनाचा छंद जोपासण्यासाठीही त्यांनी आपला वेळ दिला. वैद्यकीय उपचारांसाठी तसेच रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बनविणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. उंचापुरा बांधा, पांढरी शुभ्र दाढी, जणू पायाला भिंगरी लागली असावी अशा तऱ्हेने मोटारसायकलवर फिरणारे असं रूप असलेले तेंडुलकर पुण्यात अनेक सार्वजनिक कामात हटकून दिसायचे. नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण असो किंवा राजकीय आणि सामाजिक विषयावर चितारलेले व्यंगचित्र असो तेंडुलकर यांचे खास नर्मविनोदी शैलीतील भाष्य सर्वाचे लक्ष वेधून घ्यायचे. पुण्याची वाहतूक समस्या आणि पर्यावरणाचा प्रश्न हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. पण, केवळ ब्रशच्या फटकाऱ्याने व्यंगचित्र चितारून आणि शब्दांचे फटकारे मारून तेंडुलकर कधीच स्वस्थ बसले नाहीत. ते सातत्याने भूमिका घ्यायचे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी व्हायचे. सार्वजनिक जीवनातील त्यांचा उत्साही सक्रिय सहभाग हा लक्षणीय ठरायचा. आपला स्वभाव हा टपली मारणारा, हसत हसत दुसऱ्याची टोपी उडवणारा आहे. आयुष्य ही मोठी मौज आहे आणि जगण्यातील आनंद आपण पुरेपूर लुटतो असे त्यांचे साधे, सोपे तत्त्वज्ञान होते. अत्यंत मृदुभाषी, आवाजात मार्दव असलेले तेंडुलकर हे कधीच आक्रस्ताळेपणाने वागले नाहीत. त्यांची रेषा ही त्यांच्याप्रमाणे भारदस्त, हास्याचे फवारे आणि विनोदाचे शिडकावे उडवणारी होती. ती कधी उग्र किंवा बोचकारणारी नव्हती.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पीएमटीचे नामकरण त्यांनी ‘पुणे मृत्यूलोक ट्रान्स्पोर्ट’ असं केले होते. आताच्या ‘पीएमपी’च्या कारभाराबाबत तेंडुलकर यांनी कुंचल्याचे फटकारे मारले असले, तरी वयाची सत्तरी पार केल्यानंतरही तेंडुलकर दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेला कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात भर उन्हात उभे राहून शुभेच्छापत्राद्वारे वाहतुकीचे नियम, शिस्त पाळावी म्हणून जनजागृती करायचे. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण. पुणे वाहतूक पोलिसांसमवेत तेंडुलकर यांनी व्यंगचित्रांद्वारे जनजागृतीच्या अनेक मोहिमा राबविल्या. दर तीन महिन्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आपल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन ते भरवायचे. पण दरवेळी किमान १५ ते २० व्यंगचित्रे नवीन, ताजीतवानी आणि तजेलदार असायची. व्यंगचित्र कार्यशाळा असो किंवा आर. के. लक्ष्मण यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराला श्रद्धांजलीचा कार्यक्रम तेंडुलकर हे नेहमी व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक दाखवायचे. न थकता दर्दी प्रेक्षकांना त्यांचं अर्कचित्र काढून द्यायचे. मिश्कील स्वभाव, अचाट विनोदबुद्धी, अफाट निरीक्षणशक्ती, खुसखुशीत शैली ही तेंडुलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े त्यांच्या व्यंगचित्रांतून सहजपणे झळकायची. वयाच्या पंचाहत्तरीनंतरही ते सतत व्यग्र असायचे. विनोदाचे टॉनिक घेतल्यामुळे अखंड कार्यरत असायचे. नवीन नाटक असो वा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पुण्याच्या नागरी समस्येबाबत आंदोलन, चर्चा त्याला तेंडुलकर यांची हजेरी हमखास असायची. स्वत:च्या मृत्यूकडेही तटस्थपणे पाहणारे आणि खोडकर, रेवडी उडवणारे तेंडुलकर चिरकाल स्मरणात राहतील.

श्रद्धांजली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : मंगेश तेंडुलकर मोठे की त्यांच्या बोटातून उमटलेली व्यंगचित्रे मोठी असा प्रश्न मला सतावत राहील. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर त्यांनी व्यंगचित्रांतून मार्मिक टिप्पणी केली. त्यांची व्यंगचित्रे सुंदर लेखाइतकी, कुसुमाग्रज यांच्या कवितेइतकी आणि राजवाडे यांच्या संशोधनपर लेखनाइतकी महत्त्वाची आणि प्रभावी आहेत. हा सरस्वतीचा पुत्र आकस्मिक गेला याचे दु:ख वाटते.

शि. द. फडणीस : विषयाचे वैविध्य, रंगीत, शब्दविरहित अशी व्यंगचित्रांची सर्व माध्यमे तेंडुलकर यांनी समर्थपणे हाताळली. विजय तेंडुलकर यांचे बंधू ही एकमेव ओळख त्यांनी आपल्या कुंचल्याने पुसून टाकत स्वत:ची नाममुद्रा उमटवली. केवळ ब्रशचे फटकारेच नाहीत तर, त्यांचे शब्दसामथ्र्य नाटय़समीक्षेतून ध्यानात आले. केवळ स्टुडिओत रमणारा कलाकार नाही तर, व्यासपीठावरून समाजाविषयीचे चिंतन मांडणारे आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून समाजाशी एकरूप होणारे असे तेंडुलकर एकमेव चित्रकार होते.

डॉ. गो. बं. देगलूरकर : एक विलक्षण रसायन असलेल्या तेंडुलकर यांच्याकडे मी एक विचारवंत म्हणून पाहतो. वलयांकित असूनही जनहिताच्या प्रश्नावर योग्य विचारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर पत्रके वाटणारे तेंडुलकर सर्वानी पाहिले आहेत. सामान्य गोष्टींकडे लोकांची दृष्टी वळविण्याचे सामथ्र्य असलेल्या तेंडुलकर यांच्या निधनाने समाजाची हानी झाली आहे.

चारुहास पंडित : माझ्या व्यक्तिगत कलाप्रवासात तेंडुलकर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. या वयातही कार्यरत असलेल्या तेंडुलकर यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची हानी झाली आहे. सिग्नलला उभे राहून पत्रके वाटण्याचे काम ते शांतपणे आणि ठामपणे करीत असत. त्याचा त्रासही त्यांना भोगावा लागला. पण, आपल्या सामाजिक कामाच्या निष्ठेपासून ते कधी ढळले नाहीत. निर्भीड, निरागस, मिश्कील अशा तेंडुलकर यांनी मृत्यू या विषयावर चित्रमालिका करून अशा विषयाकडे तटस्थपणे पाहता येते हे दाखवून दिले होते.

पुस्तके

संडे मूड (५३ लेख आणि व्यंगचित्रांचा समावेश)

अतिक्रमण

कुणी पंपतो अजून काळोख

‘बिंतेशा? दाकेशां’

पुरस्कार

त्यांना नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा पटवर्धन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेतर्फे गो. रा. जोशी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.