खोटय़ा माहितीने भरलेला आणि खरी माहिती लपवून ठेवणारा पर्यावरण अहवाल एकमताने फेटाळून लावायला हवा. अशा अहवालावर बोलणे म्हणजे आपलाच अपमान करून घेण्यासारखे आहे. असले अहवाल तयार करण्यापेक्षा पर्यावरणाला शुभेच्छा देऊन दहा पानांचा अहवाल पुढच्या वर्षीपासून द्या, अशी कडवी टीका करत विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी मंगळवारी महापालिकेच्या खास सभेत पर्यावरण अहवालाची पुरती धुलाई केली.
महापालिका प्रशासनाने तयार केलेला सन २०१२-१३ चा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल मंजूर करण्यासाठी मंगळवारी खास सभा बोलावण्यात आली होती. नगरसेवकांनी केलेल्या सूचनांचा तसेच उपाययोजनांचा विचार करून पुढील अहवालात त्यांचा समावेश करावा, अशी उपसूचना देऊन हा अहवाल एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र त्या आधी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अहवालावर जोरदार टीका करत त्यातील अनेक त्रुटी उघड केल्या.
विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी पाऊण तासाच्या भाषणात अहवालाची शब्दश: चिरफाड केली. गेल्या अनेक अहवालातील तक्ते आणि माहिती या नव्या अहवालात जशीच्या तशी कॉपी-कट-पेस्ट पद्धतीने छापली आहे. इतकेच नाही, तर त्या त्या वर्षी त्या माहितीत ज्या चुका होत्या, त्याच चुका यंदाही तशाच आहेत. गेल्या वर्षी शहराचे आरोग्य, झोपडपट्टय़ांमधील वाढ, शहराचा ऐतिहासिक वारसा, परवानगी दिलेली बांधकामे अशा अनेक विषयांवर मी बोललो, टीका केली, तर यंदाच्या अहवालातून हे सर्व विषयच वगळण्यात आले आहेत, असे शिंदे यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिले. एखाद्या विषयावर टीका केली, हरकती घेतल्या की तो विषयच अहवालातून वगळून टाकायचा हे शहरासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.
कट-पेस्ट अहवालामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकही रस्ता नव्याने शहरात झालेला नाही, एकाही जलवाहिनीचे काम झालेले नाही तसेच अन्यही कामे गेल्या वर्षी होती इतकीच यंदाही असल्याचे दिसत आहे. मग यंदा या कामांवर जे कोटय़वधी रुपये खर्च झाले त्याचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत शिंदे म्हणाले, की दरवर्षी असा नवा अहवाल करण्यापेक्षा हाच अहवाल पुढच्या वर्षांसाठी देखील गृहीत धरा आणि मंजुरी द्या. दरवर्षी अहवाल करण्यापेक्षा पर्यावरणाला शुभेच्छा देऊन दहा पानात अहवाल संपवून टाका.
सभागृहनेता सुभाष जगताप म्हणाले, की पर्यावरणाबाबत प्रशासन चांगले काम करत आहे. मात्र, अहवालात नेमकी सद्य:स्थिती प्रशासनाने मांडली पाहिजे. सभेत महापौर चंचला कोद्रे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, वैशाली बनकर, वर्षां तापकीर, माधुरी सहस्रबुद्धे, मुकारी अलगुडे, बाळा शेडगे, सतीश म्हस्के, सुनंदा गडाळे यांचीही भाषणे झाली.