पुणे : संवाद, सहभाग, संवर्धन, संपर्क, सन्मान आणि सहजानंद हेच राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचे सूत्र असून, त्याअंतर्गत अनेक ठळक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी येथे दिली.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘राज्याचे सांस्कृतिक धोरण’ या विषयावर ते बोलत होते. सभेचे अध्यक्ष डाॅ. दीपक टिळक, उपाध्यक्ष रोहित टिळक आणि कार्यवाह गीताली टिळक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्कृती म्हणजे काय, ती कुठे असते, धोरण ठरविताना कोणत्या घटकांचा समावेश होतो आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक धोरणाचे सूत्र काय आणि त्यातील ठळक बाबींची माहिती शेलार यांनी दिली. ते म्हणाले, ‘मानव विकासाच्या उत्क्रांतीचा प्रवास म्हणजे संस्कृती असून, भाषा, व्यवसाय, धर्म, गुण आणि वर्तणुकीशीही तिचा संबंध आहे. भक्तिमार्ग आणि शक्तिमार्गात तिचे स्थान असून, देव, दैवते, कुलदैवत, कुलस्वामिनी, लोकगीते, अभंग, पालखी, दिंड्या या विचाराधारा हे तिचे स्वरूप आहे. त्यामुळे राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविताना संवाद, सहभाग, संवर्धन, संपर्क, सन्मान आणि सहजानंद हेच सूत्र अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आले आहे.’
‘सर्व शाळांत मराठी अनिवार्य, अभिजात मराठीचे जागतिकीकरण, सांस्कृतिक धोरणाला तंत्रज्ञानाची जोड, गडकिल्ले आणि वारसा शाळांचे संवर्धन, प्रचार, प्रसार माहितीवर आधारित धोरणांची अंमलबजावणी, लोककला आणि आदिवासी कलांचे जतन, अनुदान आणि संशोधन, नाट्य आविष्कारांचे बळकटीकरण, त्यांना अनुदान आणि प्रोत्साहन देत सांस्कृतिक व्याप्ती वाढविणे या सांस्कृतिक धोरणाच्या ठळक बाबी आहेत,’ असे शेलार यांनी सांगितले.