संजीवनी रुग्णालयाच्या आवारात असलेले अशोकाचे मोठे झाड परवानगीविना तोडल्याबद्दल पोलिसांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे झाड गेल्या आठवडय़ात तोडण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
एरंडवणे येथे धोंडूमामा साठे आयुर्वेद महाविद्यालयाचे संजीवनी रुग्णालय आहे. तिथे अशोकाचे पूर्ण वाढलेले झाड होते. ते झाड गेल्या आठवडय़ात तोडण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वास चव्हाण यांनी केली होती. चव्हाण यांना गेल्या आठवडय़ात हे झाड तोडल्याचे पाहायला मिळाले. त्याबाबत त्यांनी उद्यान विभागाकडे माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. त्यात असे समजले की, हे झाड तोडण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झाडांचे जतन अधिनियम, १९७५ या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रभात पोलीस चौकीचे फौजदार सोनावणे तपास करत आहेत.