पुणे : श्रीक्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर विकास आराखड्यांतर्गत कामे करताना मंदिरांच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला हेरिटेज स्वरूप देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
राज्यासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिरांच्या कामांना गती देण्यासंदर्भात मंदिर परिसर विकास आराखड्याची आढावा बैठक उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतली.
पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालयाच्या पुणे विभागाचे सहायक संचालक विलाक वाहणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गजानन पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
‘अष्टविनायकांपैकी मयूरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), वरदविनायक (महड), सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरात सुरू असणारी विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत,’ अशी सूचना पवार यांनी केली.
अष्टविनायक मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे. मंदिर परिसरात मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी. मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी बांधकामे काढून आपत्कालीन स्थितीमध्ये मंदिर परिसरात रुग्णवाहिकेसह अग्निशामक दलाची वाहने सहज जाऊ शकतील, अशी मार्गव्यवस्था करावी, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.