नगरसेविका रेश्मा अनिल भोसले यांच्या मिळकतकराची थकबाकी असतानाही हा कर त्यांनी पूर्वीच भरल्याचे दाखवत संगणकीकृत माहितीत फेरफार केल्याच्या प्रकरणात पालिकेच्या सहायक आयुक्तांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कर आकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त दयानंद सायबा सोनकांबळे (वय ४७, रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी) व संगणक प्रमुख सुनील तात्याराम कांबळे (वय ४९, रा. धानोरी) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी महापालिकेचे कर्मचारी वैभव भानुदास कडलाख (वय ४८, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या संगणक विभागाचे काम न्याती इन्फोसिस अॅण्ड संदीप असोसिएट या कंपनीला कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे. भोसले यांच्या शिवाजीनगर येथील मिळकतीच्या कराचा भरणा २१ फेब्रुवारी २०१२ रोजी करण्यात आला होता. त्याची संगणकावर नोंद असतानाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यात फेरफार करून हा भरणा पूर्वीच म्हणजे २४ जानेवारी २०१२ मध्ये झाला असल्याची नोंद केली. त्यानंतर भोसले यांना ना हरकत प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी गौतम सुरेश साळुंके (वय २९, रा. धायरी) या कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
सोनकांबळे हे संबंधित विभागाचे सहायक आयुक्त असल्याने कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती. त्याचप्रमाणे कांबळे हा संगणकप्रमुख असल्याने या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. संगणकीकृत माहितीमध्ये करण्यात आलेला हा बदल कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली करण्यात आला किंवा त्याच्यासाठी काही आर्थिक देवाणघेवाण झाली का, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील एस. एम. कदम यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली.