पिंपरी : ‘संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपण्याचे श्रेय वारकरी संप्रदायाला आहे. ही मूल्यविचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने परकीय आक्रमण होत असताना वैचारिक गुलामगिरी स्वीकारली गेली नाही. सांस्कृतिक मूल्यांना कोणी कधीच गुलाम करू शकले नाही. आक्रमण झाले, त्या वेळी सांस्कृतिक परंपरेने विचार आणि मूल्ये जिवंत ठेवली. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्मभेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णजयंती दिनानिमित्त आळंदीत आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावरील सुवर्ण कलशारोहण समारंभात शुक्रवारी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, मारुती महाराज कुऱ्हेकर, नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, बाबाजी काळे, देवेंद्र पोटे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, ॲड. रोहिणी पवार, चैतन्य कबीर, पुरुषोत्तम पाटील या वेळी उपस्थित होते.

‘संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे,’ असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘संपूर्ण सुवर्णाचा कलश असणारी मंदिरे देशात बोटांवर मोजण्याइतकी आहेत. त्यामध्ये माउलींच्या मंदिराची भर पडली. माउलींनी दिलेला विचार शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे.’

‘भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जगात स्वीकारले जात आहे. माउलींनी नऊ हजार ओव्यांच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, ‘अलंकापुरी म्हणून परिचित असलेली आळंदी मराठीचा प्रसार आणि भागवत धर्मासाठी महत्त्वाचे स्थान आहे. देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही.’

‘आळंदी विकास आराखड्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. आमचे फटाफट असते. कोणतेही कारण न देता जागेवर निर्णय घेतो. वारकरी संप्रदायासाठी शक्य ते केले जाईल,’ अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

‘लाडकी बहीण योजनेबाबत लोक उलसुलट चर्चा करीत असतात. महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. जे बोललो, सांगितले, ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे. आम्ही मुद्रित चूक करणारे नाही,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.