पिंपरी महापालिकेतील एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे यांच्या बदलीचा विषय गेल्या पाच महिन्यांपासून चर्चेत आहे. दोन महिन्यांपूर्वी शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत माने रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात, ते शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले आणि या क्षणाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या मुंढेंची खऱ्या अर्थाने ‘सुटका’ झाली.
चार वर्षांहून अधिक काळ पिंपरी महापालिकेत असलेल्या आणि जकात उत्पन्नात तब्बल ५०० कोटींची भर टाकलेल्या अशोक मुंढे यांच्या बदलीची प्रक्रिया एप्रिलपासूनच सुरू झाली होती. तत्पूर्वी, नव्याने लागू झालेल्या एलबीटीची व्यवस्था लावून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांच्या जागी कोण, याविषयी अनेक तर्क होते, अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. एलबीटीमुळे मुंढे यांनी आणखी एक वर्षे पिंपरी पालिकेत काम करावे, असा सूरही होता. मात्र, पिंपरीत आणखी थांबण्यास ते तयार नव्हते. रडतखडत का होईना माने यांची एलबीटी प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. मात्र, त्यानंतरही दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत ते रुजू होत नव्हते. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या नियमावर बोट ठेवून काम करण्याच्या ‘खाक्या’मुळे माने पिंपरीत यायला उत्सुक नसावेत, अशी चर्चा होती. त्याचप्रमाणे, त्यांना शिर्डीतून सोडण्यात आले नव्हते, असेही सांगण्यात येत होते. अखेर ते रुजू झाले. शुक्रवारी पालिका सभेत माने यांचा सत्कार व ओळख करून देण्यात आली आणि पाच महिन्यांपासून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंढे यांची ‘सुटका’ झाली.