पीडित महिलांना मदत करण्याच्या उद्देशातून राज्यातील पहिले निर्भया केंद्र पुण्यामध्ये होत आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या केंद्रासाठी मुंढवा येथील ‘माहेर’ या संस्थेच्या प्रकल्पाची जागा महिला बालविकास आयुक्तालयाकडे सुचविण्यात आली आहे.
दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पीडित महिलांना मदत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पीडित महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक राज्यामध्ये निर्भया केंद्र (वन स्टॉप सेंटर) सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रत्येक राज्यामध्ये निर्भया केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सार्वजनिक, खाजगी ठिकाणी कुटुंबामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी शारीरिक, लैंगिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक छळ झालेल्या पीडित महिलांना या केंद्राच्या माध्यमातून तातडीची मदत मिळणार आहे. या केंद्रामार्फत वैद्यकीय साहाय्य, पोलीस तक्रार नोंदविण्यासाठी मदत, मानसिक आधार, समुपदेशन, न्यायविषयक मार्गदर्शन, तात्पुरती निवासाची सोय अशा प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतील. याबरोबरच २४ तास हेल्पलाइन आणि आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधाही केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यातील निर्भया केंद्र पुण्यामध्ये व्हावे यासाठी मुंढवा येथील ‘माहेर’ या मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पाची जागा आयुक्तालयाला सुचविली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल, असे उपक्रम या केंद्रातर्फे राबविले जातील.
– आमदार माधुरी मिसाळ
