पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात आरबीएल बँकेचे एटीएम चार अज्ञात लोकांनी फोडले असून यातून ८ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली असून आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अजय लक्ष्मण कुरणे (वय ३६, रा. आळंदी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चिखली परिसरातील तळवडे रोडवरील आरबीएल बँकेचे एटीएम अज्ञात चार जणांच्या टोळक्याने गॅस कटरच्या सहाय्याने कट करून ८ लाखांची रक्कम लंपास केली. दरम्यान, एटीएममध्ये प्रवेश करताच अज्ञातांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला असल्याने घटना सीसीटीव्हीत कैद झाली नाही. मात्र, चोरट्यांचा चेहरा त्यात काही प्रमाणात कैद झाला. त्यावरून चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संबंधित बँकेला घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार चिखली पोलिसांना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी एटीएम फोडणाऱ्या दोन अभियंत्यांना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून ६६ लाख रुपये हस्तगत केले होते. त्यांनी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन एटीएमवर डल्ला मारून ७७ लाख लंपास केले होते. मात्र, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळत ६६ लाख रुपये हस्तगत करत अटक केली.