दहीहंडीचा सराव पाहणाऱ्या तरुणावर वैमनस्यातून टोळक्याने हल्ला केल्याची घटना कसबा पेठेतील भोई आळीत घडली. दहीहंडीचा सराव करणाऱ्या पथकातील तरुणांवर टोळक्याने दगडफेक करुन दहशत माजविली.
या प्रकरणी ऋषीकेश सुनील बागुल, भूषण गायकवाड, तुषार कैलास काकडे, प्रदीप संतोष पवार , भैय्या शिरोळे (सर्व रा. एसआरए बिल्डींग, शिंदे वस्ती, हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देव काका शिरोळे (वय १९, रा. भोई आळी, कसबा पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देव शिरोळे आणि आरोपींची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. कसबा पेठेतील भोई आळीत दहीहंडी पथकाचा सराव पाहत शिरोळे थांबला होता. त्या वेळी आरोपी बागुल, गायकवाड, काकडे, पवार, शिरोळे याने त्याला अडवले आणि कोयता उगारुन मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी दहिहंडीचा सराव करणाऱ्या तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून दगडफेक केली.
टोळक्याने परिसरात दहशत माजविली तसेच रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकींवर दगडफेक करुन टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.