पुणे : ‘युवा कलाकारांना फुलण्यासाठी देण्यात येणाऱ्या अभ्यासवृत्तीसाठी रंगसेतू हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामध्ये शरीराचा आत्म्याशी, कलाकारांचा प्रेक्षकांशी आणि विचारांचा अभिव्यक्तीशी होणारा सेतू अभिप्रेत आहे. आपल्या कलेचा इतर कलांशी किती संबंध आहे, हे पडताळून पाहिले पाहिजे. रील्स करण्यापुरते मर्यादित राहू नका. तर, आपल्याशी संवाद करून माणुसकीचा सेतू उभारावा,’ अशा शब्दांत प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी नवोदित कलाकारांना गुरुमंत्र दिला.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने अतुल पेठे यांच्या हस्ते मुग्धा असनीकर (नृत्य), अथर्व कुलकर्णी (संगीत), नीलेश पवार (नाट्य), दर्शन महाजन आणि सानिका राजपुरे (दृश्य कला) या युवा कलाकारांना रंगसेतू अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली. संस्थेच्या शुभांगी दामले, प्रमोद काळे आणि चैतन्य कुंटे या वेळी उपस्थित होते.
कलाकारांना श्वास घेता येईल, अशी स्थाने निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे आभार मानून पेठे म्हणाले, या माध्यमातून सात वर्षांत ३५ जणांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. केवळ आपल्या कलेपुरते मर्यादित राहू नका. अंतर्मुख होत नाही तोपर्यंत अंतर्दृष्टी लाभत नाही. आपल्या कलेला अन्य ललित कलांशी जोडून घेतानाच आपल्या आत डोकावून बघण्याचा सराव केला पाहिजे. त्यातून आपल्याशी संवाद करत माणुकीचा सेतू उभारला गेला तर या शिष्यवृत्तीचे फलित ठरेल.’
गेल्या वर्षी रंगसेतू अभ्यासवृत्तीच्या मानकरी ठरलेल्या कलाकारांनी आपला कलाविष्कार सादर केला. मृणाल शेळके यांच्या पारंपरिक लावण्या, विकीराज कादळे यांचे भरतनाट्यम, प्रतीक हलगे यांचे ‘सोंगाड्या’ या विषयाशी संबंधित लघु नाट्य आणि अक्षय वर्धावे यांचे गायन झाले. स्मृती जोशी आणि किरण मुणगेकर यांच्या चित्रकृतींचे छोटेखानी प्रदर्शन भरविण्यात आले होते.