राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खुनी हल्ला केल्याच्या प्रकरणात फरार असलेला शहर भाजपचा सरचिटणीस व माजी नगरसेवक बाबा मिसाळ गुरुवारी पोलिसांना शरण आला. त्याला पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणात आधी पराग अशोक शहा आणि जगदीश श्रीमंत शिवेकर यांना अटक करण्यात झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र देशमुख यांच्यावर २ डिसेंबर रोजी खुनी हल्ला केला होता. त्यांच्यावर धारदार हत्यारांनी २२ वार करण्यात आले होते आणि दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी शहा व शिवेकर यांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी असलेला मिसाळ पसार झाला होता. त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज नामंजूर झाल्यानंतर त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. या पाश्र्वभूमीवर मिसाळ गुरुवारी सहकारनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.