शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज ९६ व्या वर्षांत पदार्पण

‘उभं आयुष्य छत्रपती शिवाजीमहाराज आणि त्यांचा काळ शोधण्यात गेलं. अजूनही हे कार्य अपुरं वाटतं. ते पूर्ण करण्यासाठी अजून एक आयुष्य मिळावं..!’

संपूर्ण आयुष्य केवळ ‘शिवाजी’ या तीन अक्षरांसाठी जगणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही इच्छा व्यक्त केली. २९ जुलै हा शिवशाहिरांचा जन्मदिवस पण ते दरवर्षी हा दिवस तिथीने नागपंचमीला साजरा करतात. नागपंचमीला (गुरुवारी) ते ९६ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. या निमित्ताने ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते.

जसे कळू लागले, तसे ‘शिवाजी’ या शब्दाशी माझे नाते जुळले असे सांगत शिवशाहीर म्हणाले, की पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझे हे नाते फुलत गेले, प्रगल्भ झाले. आज ते माझ्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग बनले आहे. जगाच्या पाठीवर जी काही थोडी अलौकिक व्यक्तिमत्त्व होऊन गेली, त्यात छत्रपती शिवरायांचा समावेश करावा लागेल. या व्यक्तिमत्त्वाने अनेकांवर गारूड केले तसे ते माझ्यावरही झाले. आणि यातूनच माझ्याकडून ही शिवकाळाची सेवा घडली.

आपल्या कार्याची प्रेरणा सांगताना शिवशाहीर म्हणतात, ‘गुलामीत पिचलेल्या, अत्याचाराने ग्रासलेल्या, सत्त्व हरवलेल्या समाजात शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले. बालपणापासून त्याचा ध्यास घेतला. आणि पुढे हे स्वप्न प्रत्यक्षातही उतरवले. उनापुरा पन्नास वर्षांचा हा कालखंड थक्क करणारा आहे. घटनाक्रम, प्रसंग विलक्षण आहेत. या साऱ्यामागे कर्तबगारी, पराक्रम हे गुण तर आहेतच पण त्याहीपेक्षा शिवरायांच्या अंतरंगात दडलेले प्रखर बुद्धिमत्ता, चातुर्य, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, गुणग्राहकता, संघटन कौशल्य, उत्तम नेतृत्व आणि सर्वात महत्त्वाचे एक सहृदयी मानवी चेहरा हे गुण मला सतत आकर्षित करतात. या गुणवैशिष्टय़ांमध्ये आजही समाजाच्या प्रेरणा दडलेल्या आहेत. कदाचित यातूनच माझ्याकडून हे शिवकाळाचे उत्खनन घडले असावे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखन, संशोधन, व्याख्याने, भ्रमंती, शाहिरी, अभिनय, विविध संस्थांचे निर्माण या आणि अशाच अनेक माध्यमांतून शिवशाहीर गेली ९ दशके छत्रपती शिवाजीमहाराज आणि त्यांच्या कालखंडाचा शोध आणि बोध घेत आहेत. श्री राजाशिवछत्रपती या शिवचरित्रासह ३० हून अधिक ग्रंथांचे लेखन, तब्बल साडेतेरा हजारांहून अधिक व्याख्याने आणि ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे एक हजारांहून अधिक प्रयोगांचे सारथ्य त्यांनी केले आहे. आजही वयाच्या या टप्प्यावर सतराव्या शतकाच्या संशोधनात ते गर्क असतात. पहाटे चार वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस वाचन, लेखन, संशोधन, विद्यार्थी-अभ्यासकांना मार्गदर्शन, व्याख्याने, सार्वजनिक कार्यक्रम असा करत रात्री उशिरा संपतो. शिवकाळातील अनेक नवनवे विषय आजही त्यांना सतत खुणावत असतात. महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रशासन, आरमार, भाषा या आणि अशा अनेक विषयांवर त्यांचे शोधकार्य सुरू असते. या मालिकेतच सध्या ते छत्रपती शिवरायांविषयी लेखन करणाऱ्या इतिहासातील विदेशी संशोधकांच्या लेखनाचा अभ्यास करत आहेत. थॉमस निकोलस, हेन्री ऑक्झेंडन, जॉन फ्रायर, रॉबर्ट जॉन्स, एडवर्ड अ‍ॅस्टिन, सॅम्युअल अ‍ॅस्टिन, अ‍ॅबे कॅरे, जेम्स डग्लस, सिडले ओव्हेन, निकोलो मनुची, कॉस्मे द गार्दा आदी लेखकांची बाडे सध्या त्यांनी उघडली आहेत. त्यावर स्वतंत्र लेखन करण्याचा मानस आहे. रोज पहाटे थोडे वाचन आणि थरथरत्या हाताने जमेल तसे लेखन सुरू आहे. ९५ व्या वर्षीही त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. हुशारी, स्मरण, व्यासंग आणि कार्यमग्नता कमालीची आहे. त्यांच्या या गुणवैशिष्टय़ांबद्दल विचारले, की ते गमतीने म्हणतात, ‘‘शिवकाळाच्या संशोधनाचे हे कार्य अजून खूप बाकी आहे, ते पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडून अजून एक आयुष्य मिळावे!’’