खड्डे बुजविण्यासाठी १५ कोटी
पुणे : ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. संततधारेमुळे गेल्या वीस दिवसांत प्रमुख रस्त्यांवरील जवळपास हजार खड्डे पडल्याचे पथ विभागाला आढळून आले आहे. रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांबरोबरच खड्डे बुजविण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे.
महापालिकेकडून ऑक्टोबर महिन्यापासून सेवा वाहिन्या टाकण्याबरोबरच अन्य प्रकारच्या रस्ते खोदाईसाठी शासकीय आणि खासगी कंपन्यांना शुल्क आकारून परवानगी दिली जाते. पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू होते. यंदा करोना संकटामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाली. टाळेबंदीमुळे रस्त्यांवरील वाहतूकही रोडावली होती. त्यामुळे यंदा जुलै महिन्यापर्यंत शहरातील रस्त्यांची दुरुवस्था झाली नव्हती. जुलै महिन्यापर्यंत शहर आणि परिसरात पाऊसही झाला नसल्यामुळे रस्त्यांवर खड्डेही पडले नसल्याचे चित्र होते. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या पावसाने मात्र ही परिस्थिती बदलली.
पावसामुळे प्रमुख रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे पुढे येऊ लागले. त्यातच रस्त्यांवर खड्डेही पडण्याचे, खड्डय़ांमध्ये पाणी साचण्याचे प्रकारही झाले. महापालिकेच्या पथ विभागाने गेल्या वीस दिवसांत प्रमुख रस्त्यांवरील एक हजार खड्डे बुजविले आहेत. रस्त्यांच्या दुरुवस्थेबाबत तक्रारी सुरू झाल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. पावसामुळे खड्डे बुजविण्याच्या कामातही मर्यादा येत असून उघडीप नंतर खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग मिळेल, असे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर जास्त खड्डे नसल्याचा दावाही पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शहरात एकूण १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये अंदाजे ७५० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबराचे आहेत. डांबरी रस्त्यांबरोबच सिमेंट रस्त्यांची सध्या डागडुजी सुरू आहे. खड्डय़ांचा दुरुस्ती, रस्ते पूर्ववत करणे, अनुषंगिक कामे करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यानुसार पंधरा क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बहुतांश क्षेत्रीय कार्यालयांनी खड्डे बुजविण्याच्या कामांसाठीची निविदा प्रक्रिया राबविली आहे.
खड्डे बुजविण्याची कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून सुरू आहेत. यंदा रस्त्यांवर जास्त खड्डे नाहीत. मात्र ती बुजविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख