गणेश यादव, लोकसत्ता

पिंपरी: महापालिकेचे संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय नूतनीकरणासाठी मागील सहा वर्षांपासून पर्यटकांकरिता बंद आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. आतापर्यंत २० कोटींहून अधिक खर्च झाला असताना आणखी १४ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली. प्राणिसंग्रहालय बंद असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ते कधी खुले होणार याची पर्यटक आतुरतेने वाट पाहत आहेत.

चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय आहे. दि. ३० डिसेंबर १९८९ रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम २०१६ मध्ये हाती घेण्यात आले. विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने २५ डिसेंबर २०१७ पासून प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे. कामाची पहिली मुदत ऑक्टोबर २०१८ पर्यंत होती. मात्र, सल्लागार व ठेकेदारांचे चुकीचे नियोजन आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील कोणतेही काम मुदतीत पूर्ण झाले नाही.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये ४३४ अनधिकृत होर्डिंग, धोरणाची अंमलबजावणी प्रलंबित

प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय, प्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी माहिती केंद्र, वन्यजीवविषयक ग्रंथालय, लहान मुलांना वन्यजीव संकल्पना समजावी अशा खेळांचे नियोजन करणे अशा विविध सुधारणा केल्या जात आहेत. पण, काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. येत्या काही महिन्यांत प्राणिसंग्रहालयाचे काम पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता. असे सांगितले जात असताना, प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाच्या नावाखाली आणखी १३ कोटी ९९ लाख चार हजार ७३९ रुपयांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे.

नूतनीकरणावर आतापर्यंत २० कोटींचा खर्च

प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल १४ कोटींची स्थापत्यविषयक कामे करण्यात आली. प्रशासकीय इमारत, स्टोअरेज रूम व कर्मचारी निवासस्थान, सरपटणारे प्राणी, पक्षी, मगर व सुसर आणि कासव यांच्यासाठी स्वतंत्र चार कक्षांची निर्मिती, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह या कामांचा समावेश आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामांसाठी निविदा काढण्यात आली. यासाठी पाच कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च करण्यात येत असून, प्राण्यांच्या सुरक्षेसह सुशोभीकरणाचे काम आहे. मुदत संपूनही ती कामे सुरूच आहेत. त्यानंतर आता पुन्हा १४ कोटी रुपयांची निविदा याच कामासाठी काढण्यात आली आहे. त्यामुळे नूतनीकरणावरच्या नावाखाली ३४ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

प्राण्यांच्या संख्येत घट

प्राणिसंग्रहालयातील पशू-पक्ष्यांची संख्या घटत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये प्राणिसंग्रहालयातील १३ प्राणी वयोमानानुसार दगावले आहेत. पाच मोर, एक कासव आणि एक मगर अशा सात प्राण्यांचा २०२०-२१ मध्ये विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत पक्षी, कासव, मोर, मगर, साप असे विविध १८७ प्राणी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय अधिक चांगले करण्यासाठी काही कामे व सुधारणा आवश्यक आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली. केवळ सुशोभीकरणाची नाही, तर स्थापत्यविषयक कामेदेखील या निविदेत आहेत. संग्रहालयाचे काम लवकर पूर्ण करून सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. -शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका