पुणे : मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही, अशा सूचना न्यायालयाने केल्या. 

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, शहर समन्वयक ॲड. संभाजी थोरवे, कसबा विभागप्रमुख चंदन साळुंके, युवासेनेचे राजेश पळसकर, पर्वती विभागप्रमुख सूरज लोखंडे आणि हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. सामंत यांच्या वाहनावर २ ऑगस्ट रोजी कात्रज चौकात जमावाने हल्ला केला होता. याबाबत सामंत यांच्या वाहनचालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या या सहा जणांनी ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. अतुल पाटील यांच्यामार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सहा जणांपैकी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांच्याकडून कोणतीही जप्ती करण्यात आलेली नाही, त्यांच्याकडे कोणताही तपास करणे बाकी नाही तसेच राजकीय हेतूने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने सहा जणांना जामीन मंजूर केला.