पुणे : राज्यातील कष्टकरी आणि मोलमजुरी करणाऱ्या वर्गाला आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू करण्यात आली. या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आपला दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० ठेवण्यात आली. पुण्यात महापालिकेकडून २५ आपला दवाखाने सुरू केले जाणार होते. प्रत्यक्षात केवळ एकच दवाखाना सुरू झाला असून, इतर दवाखाने सुरू होण्यात सरकारी लालफितीचा अडसर निर्माण झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना सुरू केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि झोपडपट्ट्यांतील नागरिकांसाठी सुलभ व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ७०० आरोग्य सुविधा केंद्रांचे जाळे उभारण्याचे लक्ष्य आहे. यात पुण्यात ५८ आपला दवाखाने सुरू केले जाणार होते. त्यापैकी २५ दवाखाने सुरू करण्याची तयारी पुणे महापालिकेने दर्शविली.
या योजनेअंतर्गत आपला दवाखाना खासगी भाड्याच्या जागेत सुरू करावा, असा नियम आहे. या भाड्यापोटी महापालिकेला राज्य सरकारकडून पैसे मिळणार आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी भाड्याच्या जागेपेक्षा महापालिकेच्या जागांवरच आपला दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवला.
भाड्याच्या पैशातून महापालिकेच्या जागांमध्ये कायमस्वरूपी दवाखाने सुरू केले जातील, असा हेतू त्यामागे होता. महापालिकेचा हा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चाने पहिला आपला दवाखाना मॉडेल कॉलनीतील चापेकरनगरमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केला.
महापालिकेने यंदा एप्रिल महिन्यात पुन्हा आपला दवाखान्याबाबत नवीन प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने महापालिकेकडून केवळ एकच आपला दवाखाना सुरू आहे. याचवेळी खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू होणारे ३३ पैकी १० दवाखाने सुरू झालेले आहेत. राज्य सरकारकडून निर्णय होत नसल्याने महापालिकेसमोर दवाखाने सुरू करण्याचा तिढा निर्माण झाला आहे. यामुळे कष्टकरी वर्ग आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहे.
पुण्यातील मंजूर आपला दवाखाना
- पुणे महापालिका – २५
- खासगी संस्था – ३३
प्रत्यक्षात सुरू दवाखाने
- पुणे महापालिका – १
- खासगी संस्था – १०
आपला दवाखाना महापालिकेने स्वत:च्या जागेत सुरू करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आपला दवाखाना सुरू करण्याचे काम प्रलंबित आहे. – डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका
पुण्याला एकूण ५८ आपला दवाखाना मंजूर होते. त्यापैकी २५ दवाखाने सुरू करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली होती. मात्र, हे दवाखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे हे दवाखाने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. – डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक
आपला दवाखान्यातील सेवा
उपचार व तपासणी : बाह्य रुग्ण सेवा, मोफत उपचार, मोफत तपासणी, टेलिमेडिसीन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण.
गरजेनुसार तज्ज्ञ सेवा : फिजिशियन, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ , मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ.
अधिकारी व कर्मचारी : वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि मदतनीस.