पुणे : बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे प्रसिद्ध गायक आणि गुरु पं. मुकुंद मराठे यांना बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बालगंधर्व यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त १५ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते मराठे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, बुलडाणा नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्याधिकारी शिरीष देशपांडे आणि कर सल्लगार विजयकांत कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर व कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी शुक्रवारी दिली.
या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. राजा काळे, उपेंद्र भट, बकुल पंडित, मुकुंद मराठे, अभिनेत्री गात, अभिषेक काळे, गायत्री कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, प्राजक्ता काकतकर आणि सुरेश साखवळकर यांचा सहभाग असलेली ‘रंगबहार’ ही नाट्यसंगीताची मैफल होणार आहे. १६ जुलै रोजी ‘देणे गंधर्वांचे’ हा कार्यक्रम तर, १७ जुलैला ‘संगीत संत कान्होपात्रा’ नाटक सादर केले जाणार आहे.