कलाकार आणि राजकीय नेत्यांची मागणी
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राजकीय सभा-संमेलनांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तारखा काढू नये. हे रंगमंदिर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच राखीव असले पाहिजे, अशी मागणी कलाकार आणि राजकीय नेत्यांनी केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी आमदार उल्हास पवार, प्रकाश देवळे, अभिनेत्री वर्षां उसगावकर, संस्कृती बालगुडे, अभिनेता सुशांत शेलार, परिवाराचे मेघराज राजेभोसले, नितीन मोरे, अमर परदेशी या वेळी उपस्थित होते.
मोहिते-पाटील म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असले तरी येथे वेगवेगळे कार्यक्रम अधिक संख्येने होतात. या रंगमंदिरामध्ये आणि बालेवाडी येथील क्रीडासंकुलामध्ये राजकीय कार्यक्रम होऊ नयेत.
बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच असावे ही कलाकारांची मागणी आता राजकीय नेत्यांनी उचलून धरायला हवी, अशी मागणी करीत राजेभोसले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवाराच्या माध्यमातून कलाकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
उल्हास पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिर उभारणीच्या आणि उद्घाटनाच्या आठवणी सांगितल्या. फुटाणे, उसगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.