पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथकांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सराव सुरू आहे. पाषाण-सूस रस्त्यावरील एका ढोल ताशा पथकाच्या सरावाच्या जागेतून ताशा चोरणाऱ्या चोरट्याला बाणेर पाोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १२ ताशे जप्त करण्यात आले.

पाषाण-सूस रस्त्यावर एका ढोल ताशा पथकाकडून सध्या सराव सुरू आहे. दररोज सायंकाळी या भागात मोठ्या संख्येने सरावासाठी युवक-युवती जमतात. सरावाच्या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी १२ ताशे चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबत बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. बाणेर पोलिसांनी तपास सुरू केला. ढोल ताशा पथकाच्या सरावाच्या ठिकाणापासून पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जवळपास ४४ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर पोलिसांनी वसिम हसिबूर शेख (वय २२, रा. ननावरे पुलाजवळ, सुस गाव) याला अटक केली. त्याच्याकडून १२ ताशा जप्त केले आहेत. त्याने आणखी किती ताशे चोरले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावंत यांनी दिली.

बाणेर परिसरात दागिने, तसेच मोबाइल हिसकाविणाऱ्या दोन चोरट्यांना पोेलिसांनी अटक केली. शहरात महिलांकडील दागिने, तसेच मोबाइल संच हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात बालेवाडीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली होती. बाणेर परिसरातून एका पादचारी तरुणाच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा शफिक मोदीन शेख (वय २६, रा. दुर्गानगर, त्रिवेणीनगर चौक, तळवडे) याला अटक केली. त्याच्याकडून दुचाकी आणि मंगळसूत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोबाइल संच चोरी प्रकरणात फिरोज अब्दुल कुददुसशहा (वय २१, रा. गणेशनगर, वाकड) याला अटक करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षका अलका सरग, सहायक निरीक्षक कैलास डाबेराव, नंदकुमार कदम, बाबा आहेर, किसन शिंगे, आप्पा गायकवाड, अतुल भिंगारदिवे, गजानन अवतिरक, अतुल इंगळे, प्रदीप खरात, प्रीतम निकाळजे, शरद राऊत, विकास भोरे, राेहित पाथरूट यांनी ही कामगिरी केली.