पुणे : बांगलादेशी युवतीला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने तिला भारतात आणले. त्यानंतर दलालांनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात डांबून तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावले. तिने नकार दिल्यानंतर खोलीत डांबून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर सहकारनगर पोलिसांच्या मदतीने युवतीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दलालांसह कुंटणखाना मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका सामाजिक संस्थेकडून फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेक संथेबेन्नूर, तमन्ना शेख, रकीब खान यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), पारपत्र अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिषेक आणि तमन्ना यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती आरोपी तमन्नाच्या ओळखीची आहे. तिने तिला भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. बंगळुरूत ती आरोपी रकीब याच्याकडे आली. ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष तिने तिला दाखविले होते. आरोपींनी युवतीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. तिने नकार दिला. आरोपी अभिषेक हा तमन्नाचा ओळखीचा आहे. ताे एका हाॅटेलमध्ये काम करतो. तमन्न आणि अभिषेकने युवतीला सहकारनगर भागातील एका खोलीत डांबून ठेवले. युवतीला वेश्याव्यवसाय करण्यसाठी धमकाविले. तिने नकार दिल्यानंत तिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली.

युवतीने बांगलादेशी पोलिसांना या घटनेची माहिती मोबाइलवरुन दिली. बांगलादेशातील पोलिसांनी शहरातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. समाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यतील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण आणि पथकाने शुक्रवारी रात्रभर शोधमोहिम राबविली. शनिवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून युवतीची सुटका करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिरुर तालुक्यातील कारेगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणारया चार बांगलादेशी नागरिकांना ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियमांतर्गत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. खोलना, बांगलादेश), अकलस मजेद शेख (वय ३९, रा. गोपालगंज, बांगलादेश), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय ३५), जाहिद अबूबकर शेख (वय ३०, रा. दोघे रा. नोडाइल, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.