वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरामध्ये रिक्षांची संख्या वाढविण्याबाबत शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार पुणे व पिंपरी- चिंचवड शहरात ३ हजार २०७ रिक्षा परवाने खुले करण्यात येणार आहेत. हे परवाने मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, तब्बल वीस हजारांहून अधिक बॅचधारक बेरोगजार रिक्षा परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. परवाने लॉटरी पद्धतीने देण्यात येणार असून, ही लॉटरी १२ जानेवारीला काढण्यात येणार आहे.
शहरामध्ये आवश्यक रिक्षांच्या संख्यांचे परवाने देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये त्या-त्या ठिकाणचे १५ वर्षांपासूनचे रहिवासी असलेल्या बँचधारकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी ७ जानेवारी ही शेवटची मुदत होती. शासनाने जाहीर केल्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रात ३५ हजार ६२८, सोलापूर महापालिका क्षेत्रात ४४८, नाशिक महापालिका क्षेत्रात १४१, औरंगाबाद महापालिका क्षेत्रात ३७६, नागपूर महापालिका क्षेत्रात २,०७२, तर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ३ हजार २०८ रिक्षा परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून २५ हजारांहून अधिक बॅचधारकांनी अर्ज सादर केले होते. त्यातील २० हजार ५५७ अर्जधारक पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या या अर्जदारांना आता लॉटरी पद्धतीने परवाने वितरित केले जाणार आहे. रिक्षा परवाना मिळण्याच्या दृष्टीने अनेक बेरोजगारांनी मागील काही वर्षांपासून रिक्षाचे बॅच काढलेले आहेत. त्यांना आता परवान्याची संधी मिळणार आहे. मात्र, यंदा परवाना मागणाऱ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येते.
मागील वेळी रिक्षा परवाना देण्यासाठी दहावी पासची अट घालण्यात आली होती. त्यामुळे परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी होती. यंदा मात्र ही अट नसल्याने आठवी पास बॅचधारकांनीही ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याने अर्जदारांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला. रिक्षा परवाना मागणाऱ्याला मराठी भाषेचे व विभागाचे भौगोलिक ज्ञान असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे परवाना मिळाल्यानंतर पुण्यामध्ये रस्त्यावर येणारी रिक्षा नवी न सीएनजी इंधनावर चालणारी असावी, अशीही अट घालण्यात आली आहे. परवाने ३,२०७ व अर्ज करणाऱ्यांची संख्या आठ पटींहून अधिक असल्याने आता १२ जानेवारीला होणाऱ्या लॉटरीच्या निकालाची प्रतीक्षा अर्जदार करीत आहेत. लॉटरीचा हा निकाल १३ जानेवारीला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.