शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेसाठी अनेकविध उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकालच्या तरुणाईला फेसबुकपलीकडे जग नाही, अशी तक्रार सर्रास आपल्या कानावर पडते. मात्र ‘बिईंग सोशल’ या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुण मुला-मुलींनी अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा ध्यास घेतला आहे. पुणे शहरातील १५० हून अधिक तरुण-तरुणी त्यांचे शिक्षण, नोकरी वा उद्योग सांभाळून सध्या या कामात सक्रिय आहेत आणि या कामासाठी तरुणाईला एकत्र आणणारा दुवा ठरत आहे त्यांचे आवडते फेसबुक!

उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) ही संकल्पना सामाजिक बदल घडवत असली तरी तरुण-तरुणींनी एकत्र येऊन व्यक्तिगत सामाजिक उत्तरदायित्वाचाही विचार करायला हवा, या भावनेतून ‘बिईंग सोशल – एक नई शुरुवात’चा जन्म झाल्याचे या संस्थेचे सहसंस्थापक आशिष कुमार यांनी सांगितले. सन २०१५ मध्ये दिल्ली येथे इतर दोन मित्रांसह त्यांनी या कामाला सुरुवात केली. पुढे नोकरीनिमित्त पुण्यात आल्यानंतर येथील मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले,‘ लहान मुलांना उत्तम आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण मिळावे या उद्देशाने हे काम सुरु केले आहे. दिल्ली आणि पुण्याबरोबरच मुंबई, हैद्राबाद, बंगळुरु, जयपूर, चंदीगढ शहरांमध्ये मिळून पाच हजार तरुण-तरुणी या कामासाठी स्वतहून पुढे आले आहेत.’

या उपक्रमात २५ ते ३० या वयोगटातील स्वयंसेवकांच्या मदतीने शहरातील गरीब वस्त्यांमधील, निम्न आर्थिक स्तरातील मुलांसाठी काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘बिईंग सोशल’च्या कामाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे आयटी, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर काम करत असलेले तरुण-तरुणी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता सामाजिक भावनेतून हे काम करत आहेत, असेही आशिष यांनी सांगितले.

व्यावसायिक उपचारतज्ज्ञ म्हणून काम करणारी पूजा चिंचोले म्हणाली, की समाजकार्य करायचे म्हणजे नेमके काय करायचे याची कल्पना नव्हती. परंतु ‘बिईंग सोशल’बद्दल समजताच हे आपल्यासाठी आहे याची जाणीव झाली. त्यातून दीड वर्षांपूर्वी ‘बिईंग सोशल’च्या उपक्रमात भाग घेण्यास सुरुवात केली. येथील कामाचे स्वरुप आवडले आणि मी स्वयंसेवक झाले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी केलेल्या उपक्रमातून काम सुरु झाले. आज रस्त्यावरील सिग्नलवर पैसे मागणारी लहान मुले, झोपडपट्टीत रहाणारी मुले यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आहोत. नियमित अंघोळ करणे, दात घासणे, हात धुणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे, अशा लहान गोष्टी शिकविण्यापासून सुरुवात करावी लागली, मात्र त्या गोष्टी शिकविणे त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

‘बिईंग सोशल’च्या माध्यमातून शाळकरी मुलींसाठी ‘केअरफ्री लाडो’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. शारीरिक स्वच्छता, मासिक पाळीच्या काळात घेण्याची आरोग्याची काळजी, पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिनचा वापर, त्याची विल्हेवाट या संदर्भातील मार्गदर्शन या उपक्रमातून केले जाते.

शिक्षण हा विकासाचा केंद्रबिंदू असेल तर मुलांना शाळेत यावेसे वाटायला हवे, या कल्पनेतून खराडी आणि लोहगाव परिसरातील महापालिकेच्या दोन शाळांच्या कायापालटाचे काम हे तरुण-तरुणी करीत आहेत. स्वच्छ स्वच्छतागृह, बोलक्या भिंती, आल्हाददायक वातावरण आणि शुद्ध पिण्याचे पाणी अशा सुविधा शाळांना पुरवून त्या माध्यमातून शाळांचा कायापालट करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘बिईंग सोशल’चे कार्यकर्ते करत आहेत.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Being social foundation on facebook
First published on: 19-11-2017 at 03:56 IST