पुणे : जगातील २० टक्के विदा भारतात तयार होते; मात्र, तिचे इथे जतन केले जात नाही. देशातील ९० टक्के विदा बाहेर पाठवली जाते. नंतर याच विदेच्या आधारे कृत्रिम प्रज्ञा (एआय) तयार करून तिची विक्री भारतात केली जात आहे. ईस्ट इंडिया कंपनीची पुनरावृत्ती ठरण्यासारखा हा प्रकार आहे, अशी टीका ओला कंपनीचे मुख्याधिकारी भाविश अगरवाल यांनी शुक्रवारी केली.

गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या वतीने अर्थ चक्र या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शुक्रवारी संस्थेचे कुलपती संजीव सन्याल यांनी भाविश अगरवाल यांच्याशी भविष्यातील कृत्रिम प्रज्ञेपासून वाहन उद्योगांपर्यंतच्या मुद्द्यांवर संवाद साधला. या वेळी अगरवाल म्हणाले, की भविष्यात प्रत्येक गोष्टीमागे कृत्रिम प्रज्ञेचा पैलू असणार आहे. हे स्थित्यंतर घडविणारे तंत्रज्ञान आहे. भारताने भविष्याचा विचार करून आपली स्वत:ची कृत्रिम प्रज्ञा तयार करावी. आपल्याकडे जगात सगळ्यांत जास्त विदा असून, सर्वाधिक डेव्हलपरही आपल्याकडे आहेत. जगातील प्रत्येक चिप ही भारतातून जाते असे म्हणतात. कारण भारतातील एका तरी डेव्हलपरने त्यावर काम केलेले असते.

जगातील २० टक्के विदा एकट्या भारतात आहे. मात्र, ही विदा भारतात जतन करून ठेवली जात नाही. आपली ९० टक्के विदा बाहेर पाठविली जाते आणि तिच्यावर आधारित कृत्रिम प्रज्ञा आपल्याकडे आयात होते. ईस्ट इंडिया कंपनी येथील कापूस तिकडे नेत होती आणि नंतर तयार कपडे इथे आणून विकत होती. आता ईस्ट इंडिया कंपनीची आधुनिक काळातील पुनरावृत्ती सुरू आहे. आपली विदा नेऊन त्याआधारे तयार केलेली कृत्रिम प्रज्ञा आपल्यालाच विकली जात आहे, असे अगरवाल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय भाषांमध्ये ‘कृत्रिम’

जगातील २० टक्के लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे जागतिक एलएलएममध्ये २० टक्के स्थान भारतीय भाषांना असायला हवे. परंतु, हे प्रमाण केवळ ३ ते ५ टक्के आहे. भारतीय भाषांचे मूळ, व्याकरण यात समान धागा आहे. त्यामुळे आम्ही ‘कृत्रिम’ ही भारतीय भाषेतील कृत्रिम प्रज्ञा विकसित करीत आहोत. कुंभमेळ्यात वापरण्यात येणाऱ्या कुंभ सहायक उपयोजनामागे (ॲप्लिकेशन) ‘कृत्रिम’चाच आधार आहे, असेही अगरवाल यांनी नमूद केले.