पिंपरी :‘पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखली-चऱ्होलीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन असून, ही योजना भूमिपुत्र, लघु उद्योजकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे या योजनेला तत्काळ स्थगिती देण्यात यावी,’ अशी मागणी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना त्यांनी निवेदन दिले आहे. ‘महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली आणि चऱ्होलीसाठी नगररचना योजना जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या योजनेला विरोध आहे. भूमिपुत्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता प्रशासन मनमानीपणे अशी योजना राबवू शकत नाही. प्रशासकीय राजवट पुढे करून भूमिपुत्र व स्थानिकांवर अशाप्रकारे योजना लादणे अत्यंत खेदजनक आहे,’ असे लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

‘भाजपच्या सत्ताकाळात गेल्या दहा वर्षांमध्ये पिंपरी- चिंचवडमधील समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास झाला. समाविष्ट गावांमधील वाडी-वस्त्यांवर रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. भूमिपुत्रांना विश्वासात न घेता प्रशासनाने ही योजना लादल्यास नागरिकांचा रोष निर्माण झाला, तर त्याला जबाबदार कोण,’ असा सवाल लांडगे यांनी उपस्थित केला आहे.