पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी जाळण्याची घटना घडली असून नऊ दुचाकी आणि एक सायकल जळून खाक झाली आहे. ही घटना मध्यरात्री केशवनगर चिंचवड याठिकाणी घडली. पैशांच्या किरकोळ व्यवहारातून हा सर्व प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. रोहित रवींद्र कणसे (२३) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार ऋतुराज भैरवसिंग घोरपडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतुराज आणि फिर्यादी रोहित हे दोघे एकच ठिकाणी राहतात. दोघे मित्र असून त्यांनी सव्वा लाखांचा कॅमेरा विकत घेतला होता. यासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं. हप्ते दोघांनी भरायचे असं ठरलं होतं. परंतु, फिर्यादी हा पैसे देत नव्हता, त्यांनतर काही महिन्यांनी सहमतीने तो कॅमेरा विकण्यात आला. मात्र त्या पैशांची योग्य वाटणी फिर्यादीने केली नाही. याच रागातून आरोपी ऋतुराजने मध्यरात्री सुरक्षा भिंतीवरून उडी मारून सोसायटीमध्ये फिर्यादीची पार्क केलेली दुचाकी पेटवली. मात्र, इतर दुचाकींना याची आग लागून यात नऊ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर, एक सायकल जळाली आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ठुबल हे करत आहेत.