scorecardresearch

दररोज ४ ते ५ दुचाकींची चोरी

गेल्या वर्षभरात शहराच्या वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यात १२ हजार ४२१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

२०२१ मध्ये  गंभीर स्वरुपाच्या १२ हजार ४२१ गुन्ह्यांची नोंद

पुणे : गेल्या वर्षभरात शहराच्या वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यात १२ हजार ४२१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गेल्या वर्षी शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून घरफोडी, दुचाकी चोरी, लूटमार, दहशत माजविणे, हाणामारी अशा प्रकारचे गुन्हे वाढीस लागले आहेत. २०२१ मध्ये शहरातील वेगवेगळय़ा भागातून १४९२ वाहने चोरीस गेली असून त्यात दुचाकींचा समावेश जास्त आहे.

सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर तसेच नगर रस्त्यावरील लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात आला. गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ६५ गुंड टोळय़ांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. जरब बसली तरी किरकोळ वादातून दहशत माजविणे, खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा प्रकारचे गुन्हे वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी करोना निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावणे तसेच पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील मध्यभागाच्या तुलनेत उपनगरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे.  २०२१ मध्ये शहराच्या वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यात १२ हजार ४२१ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. २०२० मध्ये गंभीर स्वरुपाचे (भाग एक ते पाच ) पाच हजार  ७२१ गुन्हे दाखल झाले होते. शहरातील गुंड टोळय़ांना जरब बसविण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा वापर करून गुंड टोळय़ांना जरब बसवली. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत शहरातील ६० गुंड टोळय़ांवर मोक्का कारवाई केली तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये ५० गुंडांवर कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

गेल्या वर्षी शहरातून १४९२ वाहने चोरीस गेली असून त्यात सर्वाधिक दुचाकी आहेत. मोटारी तसेच अन्य चारचाकी वाहनांच्या तुलनेत शहरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढत आहेत. २०२० मध्ये शहरातून ९६० वाहने चोरीस गेली होती. २०२१ मध्ये दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून शहरातून दररोज चार ते पाच दुचाकी चोरीस जात आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच सोसायटीच्या आवारातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढते आहे. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत. अशा सोसायटय़ांमधून दुचाकी वाहने चोरीस जातात.  वाहन चोरीच्या गुन्हयांना अटकाव घालणे तसेच चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. मात्र, या पथकांची कामगिरी उजवी नाही. एकूण वाहनचोरीचे गुन्हे पाहता गुन्हे उघडकीस आणणे तसेच आरोपींना पकडण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

उपनगरात वाढती गुन्हेगारी

 शहरातील मध्यभागाच्या तुलनेत उपनगरात गुन्हेगारी वाढली आहे.  पोलिसांच्या परिमंडळ एक तसेच दोनच्या तुलनेत परिमंडळ तीन, चार आणि पाचमध्ये गुन्हेगारी आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. २०२१ मध्ये परिमंडळ एकच्या अखत्यारीत ८४१ गुन्हे दाखल झाले होते. परिमंडळ दोनमध्ये एक  हजार १८५,  परिमंडळ तीनमध्ये एक हजार २४३ गुन्हे, परिमंडळ चारमध्ये दोन हजार ५५ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वाधिक गुन्हे परिमंडळ पाचमध्ये दाखल झाले असून गेल्या वर्षी  दोन हजार ७१४ गुन्हे दाखल झाले आहेत. 

परीक्षा गैरव्यवहारांचा तपास 

पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी लष्कर भरती, आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका फूट प्रकरण उघडकीस आणले. यंदाच्या वर्षी म्हाडा परीक्षा तसेच शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरण उजेडात आणले. लष्कर भरती गैरव्यवहारात पोलिसांनी देशभरात तपास करून लष्करातील बडय़ा अधिकाऱ्यांना अटक केली.  हवाला गैरव्यवहार उजेडात आणला.  तपास देशपातळीवर झाल्याने पुणे पोलिसांच्या नावलौकिकात भर पडली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bikes stolen every day robbery crime ysh

ताज्या बातम्या