महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी मात्र करोना संसर्ग कालावधीत बंद असलेली बायोमॅट्रिक्स हजेरी महापालिका प्रशासनाकडून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र अद्यापही अनेक कर्मचारी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करून उपस्थितीची नोंद करत असल्याने बायोमॅट्रिक्स हजेरी नाही तर वेतन नाही, असा आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे: तांदळाच्या कोठारात ‘इंद्रायणी’चा दरवळ; चांगल्या उत्पादनामुळे दर ५० ते ६० रुपयांदरम्यान

महापालिकेतील सेवकांसाठी प्रशासनाने बायोमेट्रीक हजेरी आधारशी जोडली आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर किती वाजता आला आणि कामाचे तास पूर्ण झाले की नाही, याची माहिती प्रशासनाला मिळत आहे. करोना संसर्ग काळात ही संगणकीय प्रणाली बंद ठेवण्यात आली होती. करोना संसर्ग नियंत्रणात आल्याने महापालिकेचे कामकाजही पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून कर्मचाऱ्यांची उपस्थितीही शंभर टक्के आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्स पद्धतीने उपस्थितीची नोंद करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले होते. मात्र त्याला कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद देण्यात आला नव्हता. त्यामुळे आता बायोमॅट्रिक्स पद्धतीने हजेरी न लावल्यास वेतन दिले जाणार नाही, असे बिनवडे यांनी आदेश काढले आहेत.

हेही वाचा- पुणे: महापालिकेच्या पाच सहाय्यक आयुक्तांना नोटीस

संबंधित खातेप्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व अधिकारी, सेवकांचे बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन झाले आहे की नाही, याची तपासणी करावी. खातेप्रमुखांनी उपआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग यांना याबाबत माहिती सादर करावी. ज्या अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये नोंद झालेली नाही किंवा हजेरी लावत नाहीत, त्यांचा १५ नोव्हेंबरपासूनचा पगार देऊ नये. यासंबंधी विभागाचे खातेप्रमुख, मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biometric attendance compulsory for pune municipal corporation employees order of municipal additional commissioner pune print news dpj
First published on: 14-11-2022 at 09:34 IST