महापालिकेच्या मुख्य सभेला दांडय़ा मारणाऱ्या नगरसेवकांच्या खऱ्या उपस्थितीची नोंद व्हावी, यासाठी आता मुख्य सभागृहाच्या बाहेर ‘यांत्रिक हजेरी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेला येताना नगरसेवकांना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवावी लागणार असून किमान त्यासाठी तरी का होईना त्यांना आता सभेच्या दिवशी सभागृहापर्यंत यावे लागणार आहे.
पुणेकरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महापालिकेत एकशेएकोणसाठ नगरसेवक असले, तरी त्यापैकी ऐंशी ते नव्वद नगरसेवकच नियमितपणे सभांना उपस्थित राहतात. उर्वरित नगरसेवक सभेत थोडा वेळ थांबतात आणि रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करून निघून जातात. त्याशिवाय अनेक नगरेसवक सभेच्या दिवशी महापालिकेत येतात, मात्र स्वाक्षरीपुरतेच सभागृहात येतात आणि स्वाक्षरी झाली, की लगेच जातात. एकदा स्वाक्षरी झाली, की सभेच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या नगरसेवकांचीही संख्या मोठी आहे. याशिवाय कितीतरी नगरसेवक आणि मुख्य सभा यांचा काही संबंधच नसतो. ते बहुतेक वेळा सभा संपता संपता किंवा संपल्यानंतर येतात आणि रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करतात. पूर्वी काही नगरसेवक असे होते की ते महापालिकेत फिरकत नसत. त्यामुळे सभेतील उपस्थितीसाठी ज्या रजिस्टरवर स्वाक्षरी करावी लागते ते रजिस्टरच त्यांच्या घरी पाठवले जात असे.
तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून महापालिका सभागृहाचे नूतनीकरण दोन महिन्यांपूर्वी झाले आणि त्याचवेळी नगरसेवकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ती यंत्रणा दोन महिने कार्यान्वित होऊ शकली नव्हती. ही यंत्रणा आता कार्यान्वित होत असून सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारात त्यासाठीचे यंत्र बसवले जाणार आहे. चालू महिन्याच्या मुख्य सभेपासून या यंत्रणेद्वारे सदस्यांना त्यांची उपस्थिती नोंदवावी लागेल. नगरसेवकांना मुख्य सभेचा भत्ता म्हणून एका सभेसाठी शंभर रुपये व एका महिन्यात अधिकतम चारशे रुपये मिळतात. मात्र, त्यासाठी नगरसेवकाची उपस्थिती नोंदवलेली असणे आवश्यक असते. ही नोंद आता बायोमेट्रिक हजेरीच्या पद्धतीने होईल. एखादा नगरसेवक सलग तीन महिने मुख्य सभेला अनुपस्थित राहिला, तर त्याचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. या सर्वच गोष्टींसाठी नगरसेवकांची सभेतील उपस्थिती महत्त्वाची असते आणि उपस्थितीची नोंद आता यंत्राद्वारे होईल.
बायोमेट्रिक पद्धतीच्या हजेरीसाठी ज्या आवश्यक तांत्रिक बाबी आहेत त्यांची पूर्तता झालेली आहे. नगरसेवकांच्या बोटांचे ठसे घेणे व अन्य एक-दोन बाबींची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांची पूर्तता होताच मुख्य सभागृहाबाहेर ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
– सुनील पारखी
नगरसचिव, पुणे महानगरपालिका
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2014 रोजी प्रकाशित
सभेला या.. हजेरी द्या..
महापालिकेच्या मुख्य सभेला दांडय़ा मारणाऱ्या नगरसेवकांच्या खऱ्या उपस्थितीची नोंद व्हावी, यासाठी आता मुख्य सभागृहाच्या बाहेर ‘यांत्रिक हजेरी’ची व्यवस्था करण्यात आली आहे.

First published on: 18-03-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biometric system for corporators in pmc