पुणे : राज्यात आणि केंद्रात महायुतीत सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाला पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने कुरघोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रभागरचना करताना महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागांची रचना बदलण्यात आली आहे. यामुळे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहेत.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारुप प्रभागरचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी जाहीर केली. प्रभागरचना करताना राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकंकडून केला जात होता. प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर या आरोपामध्ये तथ्य असल्याचे समोर आले. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीनुसारच आगामी निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रभागांची रचना करताना त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची ताकद असलेल्या प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्या असून एका प्रभागाचा भाग तोडून दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक ही भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस या तीन पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढविली. आगामी निवडणूक देखील महायुतीच्या माध्यमातून लढण्याची चर्चा सुरू असली तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल, असे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत मध्यवर्ती भागातील प्रभागांमध्ये भाजपचे तर उपनगरांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे वर्चस्व आहे. प्रभागरचना करताना पेठांमधील परिसरात फारसा बदल करण्यात आलेला नाही. मात्र, उपनगरांमधील प्रभागांच्या हद्दीत अनेक बदल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची ताकद असलेल्या प्रभागांच्या हद्दीत बदल करून ते भाग इतर प्रभागांमध्ये जोडण्यात आले आहेत. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविल्यास तेथे यश मिळणार आहे. परंतु स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कसबा’ नाव वगळले

पुणे म्हणजे ‘कसबा’ पेठ असे समीकरण आहे. मात्र, महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये ‘कसबा’ हे नाव काेणत्याही प्रभागाला देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कसबा हे नाव नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कसबा पेठ हे प्रभागाचे नाव बदलून कमला नेहरू हॉस्पिटल -रास्ता पेठ असे नाव करण्यात आले आहे. प्रभागरचनेमध्ये शिवाजीनगर, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, कोथरुड, खडकवासला ही विधानसभा मतदारसंघांची नावे प्रभागांना देण्यात आली आहेत. मध्यवर्ती भागात असलेल्या कसब्याचे नाव का वगळण्यात आले, असा सवाल स्थानिक मतदारांकडून विचारण्यात येत आहे.

तीन सदस्यांचे प्रभाग रद्द

महापालिकेची प्रभागरचना करताना महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा फटका भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना बसला आहे. कसबा विधानसभा आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिकेने त्यानुसार त्याचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने शहरातील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिकेने प्रस्तावित केलेले तीन सदस्यांचे प्रभाग रद्द करुन आंबेगाव-कात्रज हा पाच सदस्यांचा एक प्रभाग करत इतर ४० प्रभाग चार सदस्यांचा करण्यात आला आहे. हा बदल भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धक्का मानला जात आहे.