पुणे : केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप ) आता आपली भूमिका बदलली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने कोणाबरोबरही न जाता स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपला मित्रपक्ष म्हणून अनेकदा मदत केली. मात्र सत्ताधारी झाल्यानंतर त्याची कोणतीही जाणीव भाजपने ठेवली नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत रासप उमेदवार देणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच, यापूर्वी विजय मिळविण्यासाठी भाजपला मदत केली. मात्र आता भाजपला सत्तेवरून खाली आणण्याचा निर्धार देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

‘रासप’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पुण्यात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष जानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. रासपने भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मदत केली. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवली नाही, अशी टीका करताना भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मोठे काम केले. मात्र त्याची कोणतीही जाण भाजपला राहिलेली नाही. सत्तेची धुंदी भाजपवर चढली आहे,’ अशी टीका पक्षाचे अध्यक्ष जानकर यांनी केली.

‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष काेणाबराेबरही युती करणार नाही. प्रत्येक प्रभाग, गट, गण या ठिकाणी पक्षाच्या उमेदवार उभा करायचा आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केवळ समाजमाध्यमावर फोटो टाकण्यापुरते काम न करता आपला पक्ष आणि पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसे जातील, यासाठी प्रयत्न करावेत. आगामी महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक बुथवर रासपचा एक कार्यकर्ता असला पाहिजे,असे नियाेजन करा,’ अशी सूचना त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पक्षाचा जाे पदाधिकारी काम करणार नाही, त्याला पदमुक्त केले जाईल. पक्ष साेडून जाणाऱ्यांचा विचार करू नका, जे भाजपमध्ये गेले त्यांची अवस्था आज काय झाली हे तुम्ही पाहत आहात. ‘उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस’ असे त्यांचे झाले आहे. भाजपमध्ये अनेक जण प्रवेश करीत असल्याने त्यांचे जुने कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊ शकतात, याचा विचार करा. रासपचे चार राज्यांत स्थान आहे. मध्य प्रदेशमध्ये संघटन बांधणी सुरू आहे,’ असे जानकर यांनी सांगितले.