scorecardresearch

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो….”

देवेंद्र फडणवीसांची पुण्यात धमाल फटकेबाजी

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो….”

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यातील एका लोकार्पण कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडला. या व्यासपीठावर मान्यवरांनी भाषणे केली. यातील देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाने साऱ्यांचे विशेष लक्ष वेधलं. हा प्रकल्प पुणेकरांच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे या मुद्द्यावर ते बोलत होते. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी एक मजेशीर वक्तव्य केलं. “अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो….”, असं फडणवीस म्हणाले आणि कार्यक्रमात तुफान हशा पिकला.

“विस्तारित होत असलेल्या पुण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. पण पुणेकरांना या पाणी पुरवठा लोकार्पण सोहळ्याची जितकी उत्कंठा नसेल, त्यापेक्षा जास्त उत्कंठा मीडियातील लोकांना होती. १ जानेवारीला अजितदादा-देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार हीच बातमी गेले दोन-तीन दिवस मीडियामध्ये दिसत होती. आम्ही एकाच मंचावर येणार म्हणजे काय….. आम्ही कुस्ती खेळणार होतो की गाणं गाणार होतो? असं काहीही नसताना मीडियाने दोन दिवस आपल्याच बातम्या दाखवल्या. अजितदादा, मला असं वाटतं की जर दोन-तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला तुमच्या घरी बोलवा किंवा तुम्ही माझ्या घरी चहाला या. म्हणजे दोन-तीन दिवस आपल्या बातम्या चालत राहतात”, अशी मजेशीर शाब्दिक फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्यासाठी हा प्रकल्प एक संजीवनी आहे. अनेक भागात पाण्याची कमतरता जाणवत होती. त्यामुळे पुणेकरांना ही नवीन वर्षाची भेटच मिळाली आहे. योजना करताना अनेक अडचणी आल्या. गिरीश बापट यांनीदेखील यासाठी अनेक बैठका घेतल्या. सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. शहरीकरण वाढत जाणार आहे. रोजगारामुळे स्थलांतर शहराच्या दिशेने होत आहे. हे अपरिहार्य आहे. शहर बकाल होणार नाही यासाठी पाणी पुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन महत्वाचे राहणार आहे. सार्वत्रिक विचार केल्यास पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.”

“शहरात इ-बसेस वाढवण्यात येत आहे. मेट्रो चे गतीने काम सुरू आहेत. अजित पवार त्याला गती देत आहेत. सर्वच जण एकत्र येऊन काम केल्यास पुणे जागतिक स्तरावरची सिटी होईल. ‘एचसीएमटीआर’साठी पालकमंत्री म्हणून अजित पवार नकीच सकारात्मक पर्याय पुढे आणतील”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2021 at 19:24 IST

संबंधित बातम्या