पिंपरी: गेल्या आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारची हुकुमशाही सुरू आहे. त्यामुळे देश अराजकतेकडे वाटचाल करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केली आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात ते बोलत होते. कवीचंद भाट, बाबू नायर, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, कौस्तुभ नवले, अभिमन्यू दहीतुले, भाऊसाहेब मुगुटमल, मेहबूब शेख आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

कदम म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी चौकशीच्या नावाखाली केंद्र सरकारकडून नाहक त्रास दिला जात आहे. दहा वर्षांपूर्वीचे संपलेले हे प्रकरण पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात आले, यामागे तोच हेतू आहे. केंद्र सरकारच्या या जुलमी कारवाईच्या विरोधात काँग्रेसकडून संपूर्ण देशात सत्याग्रह केला जात आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात महागाई वाढली आहे. काँग्रेसने या विरोधात वेळोवेळी आंदोलन केले आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेसचा जनाधार वाढत आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांची वारंवार ईडीच्या नावाखाली चौकशी केली जात आहे, असे कदम म्हणाले.