शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असं वक्तव्य केलं आहे. ही एक धमकी असून कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये शहर भाजपाच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत पुणे दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी खोचक टीका केली होती. आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला उत्तर देत खासदार संजय राऊत यांनी “आम्ही खंजीर खुपसत नाही तर समोरून कोथळा बाहेर काढतो” असं म्हटलं होतं. या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपाच्या वतीने डेक्कन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, “संजय राऊत हे केवळ एक बोल बहाद्दर आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असतात. ते प्रत्यक्ष फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमतदेखील नाही. कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे राऊत यांनादेखील अटक करावी”. “जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आंदोलन केले जाईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान तक्रार अर्ज स्वीकारला असून विधी विभागाचा सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करू अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी यावेळी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp files case against shivsena sanjay raut in pune svk 88 sgy
First published on: 06-09-2021 at 12:44 IST