आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सुमारे तीन हजार हजारी यादी प्रमुखांनी निवडणुकीचे धडे घेतले. सोशल मीडिया, आचारसंहिता याबाबत संबंधितांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. या तीन तासिकेनंतर हजारी प्रमुखांनी ‘परीक्षा’ देत आपापल्या मतदार यातीली मतदारांची माहिती भरून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या वतीने टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे हजारी प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी या ‘शाळेचे’ आयोजन रविवारी करण्यात आले होते. राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश यांनी या शाळेत उपस्थितांना निवडणुकीचे धडे दिले. तीन हजार हजारी यादी प्रमुखांनी ४१ वर्ग खोल्यांत बसून निवडणुकीचा पाठ गिरविला.

सकाळी नऊ वाजता घंटा वाजून शाळा भरल्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, बोधकथेनंतर ‘आचारसंहिते’च्या पहिल्या तासिकेला प्रारंभ झाला. प्रा. विनायक अभ्यंकर यांनी आचारसंहितेबाबतची माहिती दिली. त्यानंतर जिनेंद्र कवाडिया यांनी ‘सोशल मीडिया’ याबाबत मार्गदर्शन केले. सुहास कुलकर्णी आणि गोपाळ चिंतल यांनी हजारी यादीचे काम कसे करावे, याची माहिती तिसऱ्या तासिकेत दिली. यानंतर हजारी प्रमुखांची परीक्षा घेण्यात आली. आपापल्या यादीतील मतदारांची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

‘देशासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची ही संघटना आहे. पुण्यात बदल घडविण्यास पुणेकर उत्सुक आहेत. महापालिकेतही भाजपचा विजय निश्चित असल्याचे,’ पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

व्ही. सतीश म्हणाले, ‘भाजप हा विचारधारेवर उभा राहिलेला पक्ष आहे. राजकीय समीकरणांवर निवडणुका जिंकता येणार नाहीत, त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. हाच मोठा प्रयोग देशात सध्या सुरू आहे. पक्षात विनाकारण कोणाला पदे दिली जात नाहीत. पक्षाची मूळ वैचारिक मांडणी तशीच ठेवून विकासाचा कार्यक्रम राबवायचा आहे.’ ‘पक्षाच्या कार्यपद्धतीची मतदारांना आणि नवीन कार्यकर्त्यांना ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगतिले. भाजपची संघटनात्मक कामगिरी, हजारी यादी प्रमुखांची कार्यपद्धती याचा आढावाही त्यांनी घेतला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, योगेश टिळेकर, प्रा.मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांच्यासह युवा, महिला आघाडीचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हजारी प्रमुख म्हणजे काय

मतदान आणि प्रचाराच्या दृष्टीने हजारी प्रमुखांचे काम महत्त्वाचे ठरते. मतदानासाठी असलेल्या बूथ अंतर्गत किती मतदार आहेत, याची माहिती हजारी प्रमुखाला असते. बुथमध्ये येणाऱ्या मतदारांना मतदानास आणणे, प्रचारादरम्यान पत्रके, कार्यअहवाल, जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचविणे अशी कामे हजारी प्रमुखामार्फत होतात. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीही हजारी प्रमुखांचे काम महत्त्वाचे ठरते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in pune
First published on: 16-01-2017 at 02:46 IST