आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा; प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाचे दर्शन

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाचे शनिवारी दर्शन घेतले. यानिमित्ताने त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी महापालिकेच्या निवडणुकीचाही आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ नड्डा यांनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याने भाजपने पुण्याकडे विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात घेत निवडणूक स्वबळावर लढाईची की महायुतीत याचा निर्णय घेतला जाईल, असे वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपचे सर्वाधिक ९८ नगरसेवक विजयी झाले होते. पुण्यात भाजपची ताकद चांगली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून त्यांचे दौरे देखील वाढले आहेत. त्यातच आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांना शनिवारी भेटी दिल्या. या दौऱ्याच्या निमित्ताने नड्डा यांनी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि शहरातील नेत्यांशी संवाद साधून चर्चा केली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन नड्डा यांनी पूजा केली. मंडळाने साकारलेल्या वेरुळ येथील अद्वितीय श्री कैलास मंदिर लेणींचे दर्शन घेत या अप्रतिम कलाकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नड्डा म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. देश स्वदेशी भारत, आत्मनिर्भर भारत तसेच विकसित म्हणून पुढे जावा, अशी प्रार्थना गणेशाकडे केली. देशवासीयांना आनंद, समृद्धी आणि कल्याण प्रदान करावे तसेच नवीन ऊर्जा मिळावी, अशी प्रार्थना केली.’

दरम्यान, पुणे दौऱ्यात नड्डा यांनी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळ, श्रीमंत भाऊ रंगारी गणेश मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाला भेट देत गणेशाचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित भारत, स्वदेशी भारत आणि आत्मनिर्भर भारत म्हणून पुढे जावा, अशी प्रार्थना गणरायाकडे केली. – जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप