केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या कामांची जंत्री देत शहर भाजपने पिंपरी-चिंचवडशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक लवकरच होणार असल्याची ग्वाही सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातून आमदार-खासदारांचा ओघ भाजपकडे सुरू असल्याचे सांगत पिंपरीतील आजी-माजी नगरसेवक आणि स्थानिक नेतेही संपर्कात आहेत, त्यांचा योग्य वेळी पक्षात प्रवेश होईल, असे स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत पिंपरी पालिका ताब्यात घेऊ, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार लक्ष्मण जगताप, शिरूरचे संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील देवेंद्र सरकारने १०० दिवसांत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कुंटे समितीचा अहवाल येत्या आठवडाभरात शासनाला सादर होईल, त्यावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होईल. नागरिकांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शास्तीकराचा प्रश्नही त्याच माध्यमातून सुटेल. संरक्षण खात्याशी संबंधित शहरातील प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी समजावून घेतले आहेत, ते लवकरच मार्गी लागतील. शासनाकडून प्रश्न सुटले नाही, तर सत्ता असली तरी नागरिकांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करू. शहराध्यक्षपदाचा निर्णय प्रदेशस्तरावर होईल, असे स्पष्ट करण्यात आले. सरचिटणीस अमोल थोरात यांनी सदस्यनोंदणी अभियानाची माहिती दिली. आतापर्यंत एक लाख पाच हजार नोंदणी झाली असून ३१ मार्चपर्यंत तीन लाखांचे उद्दिष्ट गाठू, असा विश्वास पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला.
 राष्ट्रवादीचे राजकारण मतपेढीसाठी
शहरातील महत्त्वाचे प्रश्न राष्ट्रवादीने सोडवले नाहीत. मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून वर्षांनुवर्षे ते प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आले, असा आरोप एकनाथ पवार यांनी केला. महापालिकेत होणाऱ्या चुकीच्या कारभाराविरुद्ध भाजपतर्फे आंदोलन करू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pimpri chinchwad leader
First published on: 10-02-2015 at 02:45 IST