पुणे : शहरातील विविध रस्त्यांवरील चौकांमध्ये, तसेच नदीपात्र परिसरात जाणवत असलेला पारव्यांचा आणि कबुतरांचा त्रास आता दशक्रिया विधी करणाऱ्या नागरिकांनाही होऊ लागला आहे. ‘दशक्रिया विधीच्या ‘काक स्पर्शा’त कबुतरांचे अतिक्रमण वाढत असून, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलावीत. कबुतरांचा हा वाढता त्रास कमी करण्यासाठी वन विभाग व पक्षितज्ज्ञांशी बोलून निर्णय घ्यावा,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, ‘दशक्रिया विधी करण्यासाठी घाटाच्या ठिकाणी मृत व्यक्तीचे नातेवाइक विधी केल्यानंतर पिंडदान करतात. तेथे कावळ्यांऐवजी कबुतरांची संख्या मोठी असते. येथेही कबुतरांनी अतिक्रमण केले असून, याचा त्रास नागरिकांना होतो. शहरातील विविध सोसायट्यांत, सार्वजनिक ठिकाणी या कबुतरांनी उच्छाद मांडला असून, त्यांच्या त्रासामुळे चिमणी, तसेच इतर पक्षी कालबाह्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तोच प्रकार आता दशक्रिया विधी घाटांवर कावळ्यांबाबत घडत आहे.

‘दशक्रिया घाटांवर पारव्यांची वाढत असलेली संख्या संस्कृती आणि परंपरा यासाठी घातक आहे. पारव्यांच्या या त्रासामुळे नागरिक त्रस्त आहेत. कबुतरांना उघड्यावर खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. यामुळे काही भागांत कबुतरांचा त्रास कमी झाला आहे. याच धर्तीवर वन विभाग आणि पक्षितज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून कबुतरांचा हा वाढता त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने कठोर निर्णय घ्यावा,’ अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील सोसायट्यांमध्ये, तसेच दशक्रिया घाटांवर कबुतरांचा त्रास वाढला आहे. कबुतर हा संरक्षित पक्षी नाही. त्यामुळे त्यांना नष्ट करणे चुकीचे नाही. महापालिका प्रशासनाने वन विभाग व पक्षितज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून कबुतरांबाबतचा निर्णय घ्यावा.-संदीप खर्डेकर, भाजप प्रवक्ते