‘स्वीकृत’ नगरसेवकपदाच्या उमेदवारीवरून पुण्यात भाजपमध्ये राडा झाला, तशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडलाही होती. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत भाजपमध्ये गोंधळाचे, पर्यायाने तणावाचे वातावरण होते. बरीच राजकीय उलथापालथ आणि गटातटाचे राजकारण झाल्यानंतर माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, बाबू नायर या तीनही संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची वर्णी भाजपने लावली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने भाऊसाहेब भोईर आणि संजय वाबळे या दोन्ही पराभूत नगरसेवकांना महापालिकेच्या राजकारणात नव्याने सक्रिय केले आहे.

पिंपरी पालिकेच्या निवडणुका यंदा कधी नव्हे त्या चुरशीच्या ठरल्या. आतापर्यंत काँग्रेस व नंतरच्या काळात राष्ट्रवादीने एकतर्फी बाजी मारल्याचा इतिहास पिंपरीत होता. मात्र, देशात व राज्यातील बदलत्या वातावरणात ‘नरेंद्र-देवेंद्र’च्या लाटेत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला. पवारांचा पिंपरीतील भक्कम बुरूज ढासळवणे, हे भाजपसाठी सहजसोपे काम नव्हते. त्यासाठी अनेकांचे हात लागले. नवे-जुने सगळेच कामाला लागले. प्रभागातील समीकरणे पाहून कितीतरी उमेदवारांना थांबवावे लागले. रणनीतीचा भाग म्हणून सक्षम उमेदवार असूनही त्यांची तिकिटे कापण्यात आली. अशा सर्वाना न्याय देण्याची गरज होती आणि राजकीय पुनर्वसनासाठी स्वीकृत नगरसेवकपद हा चांगला पर्याय होता. मात्र, मर्यादित जागा आणि असंख्य इच्छुक असल्याने ताळमेळ बसत नव्हता. परिणामी, भाजप असो की राष्ट्रवादी, दोन्हीकडे प्रचंड रस्सीखेच होती.

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते, तो स्वीकृत नगरसेवकपदाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. पिंपरी पालिकेत स्वीकृतच्या पाच जागा होत्या. संख्याबळानुसार सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला तीन, तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार होत्या. त्यानुसार, भाजपने संघटन सरचिटणीस माउली थोरात, सरचिटणीस बाबू नायर आणि युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष मोरेश्वर शेडगे यांना संधी दिली. तर, राष्ट्रवादीने माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, तसेच संजय वाबळे या दोघांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवकपदाची माळ घातली. यानिमित्ताने दोन्ही पक्षात अनेक घडामोडी झाल्या. भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक होते. प्रत्येकाला कोणीतरी ‘शब्द’ दिला होता. आपल्यावर कोणीतरी मेहरबान होईल, असा भोळा आशावादही कार्यकर्त्यांमध्ये होता. नव्याने शिक्षण मंडळ स्थापन होईल, सदस्य व पुढे जाऊन सभापती होऊ, अशी स्वप्ने काहींना पडू लागली होती. काहीच नाही तर प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून तरी आपला नंबर लागेल, असे गृहीत धरणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. अशा इच्छुक सदस्यांची वाढती संख्या व त्यांचा नको तितका पाठपुरावा पाहून वैतागलेल्या नेत्यांनी २० मेर्पयंत स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रियाच लांबणीवर टाकली. त्यामुळे इतर कोणत्याही पदांचा विषयच चर्चेला आला नाही. प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवडमध्ये होणार होती म्हणून आजचे मरण त्यांनी उद्यावर ढकलले. मात्र, २० मे उजाडला तरी तणाव कायमच होता. राष्ट्रवादीने भोईर व वाबळे यांची नावे जाहीर केली. मात्र, भाजपची नावे काही केल्या निश्चित होत नव्हती. गाठीभेटी, गुप्त बैठका, फोनाफोनीचे सत्र सुरूच होते. गटातटाच्या राजकारणाला ऊत आला होता. मात्र, कोणत्याही नावावर एकमत होत नव्हते. पुण्यात राडा झाला, तसाच पिंपरीतही होऊ शकतो, असे वातावरण सुरूवातीपासून होते. त्यामुळे ताकही फुंकून पिण्यासारखी स्थानिक नेत्यांची अवस्था होती.

पक्षात नवा-जुना वाद टोकाला गेलाच होता. निवडून येण्याची क्षमता असतानाही अनेक निष्ठावंतांची तिकिटे कापण्यात आली होती. त्यामुळे भाजपमध्ये स्फोटक परिस्थिती होती. मोरेश्वर शेडगे, अमोल थोरात हे भाजप परिवारातील जुने कार्यकर्ते. मात्र, ते निवडून येऊ शकत नव्हते, असे तकलादू कारण देत त्यांचा पत्ता कापण्यात आला. शेडगे थोडक्यात पराभूत झाले होते. तेव्हापासून ते पुन्हा निवडून येण्याच्या हेतूने कामाला लागले होते. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने शेडगे यांना न्याय मिळाला. अमोल थोरातांना सलग दुसऱ्यांदा ठरवून घरी बसवण्यात आले. थोरातांच्या ‘हितचिंतकांची’ संख्या खूपच मोठी असल्याचा फटका त्यांना याहीवेळी बसला. मात्र, थोरात यांच्याच भावकीतील माउली थोरात यांची वर्णी लागली. ते खासदार अमर साबळे यांचे समर्थक आहेत. थोरात यांच्या पत्नीला कासारवाडी प्रभागातून ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले व राष्ट्रवादीत आलेल्या नगरसेविकेला तिकीट देण्यात आले होते. त्याची भरपाई माउली थोरात यांना मिळाली आहे.

सदाशिव खाडे हे माजी शहराध्यक्ष आहेत. मात्र, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत नव्हते. २०१२ मध्ये त्यांना लढण्यास सांगितले, तेव्हा त्यांची जागा त्यांनी रिपाइंला सोडवून दिली. प्रभागात ओबीसी पुरूषाचे आरक्षण असले तरच लढणार, अशी भूमिका त्यांनी या वेळी सुरूवातीपासून घेतली. प्रत्यक्षात ओबीसीची जागा असतानाही ते लढले नाहीत. त्यांना स्वीकृतचा लाभ होत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सचिन पटवर्धन यांच्या सहकार्याने बाबू नायर यांची वर्णी लावली. अमर मूलचंदाणी यांचे नाव शेवटपर्यंत आघाडीवर होते. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला. कालपरवा भाजपमध्ये आलेल्या सारंग कामतेकर यांच्या संभाव्य उमेदवारीवरून पक्षात बरीच अस्वस्थता होती. मात्र, तीव्र विरोध झाल्याने त्यांचाही हिरमोड झाला.

राष्ट्रवादीची दमदार उतारी

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाऊसाहेब भोईर आणि संजय वाबळे यांची निवड करून ज्येष्ठता आणि अनुभवाला महत्त्व देत दमदार उतारी केली असून भोसरी आणि चिंचवड विधानसभेचे गणितही डोळ्यासमोर ठेवले आहे. भोईर हे तसे मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक पदे उपभोगली. चिंचवड विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवली. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून घेणारे भोईर पालिका निवडणुकीच्या तोंडावर समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल झाले. कारण, काँग्रेसला कसलेही भवितव्य नव्हते. भोईरांना आमदार व्हायचे आहे, ते काँग्रेसकडून होणे शक्य नव्हते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी भोईरांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत, तेच त्यांना राष्ट्रवादीत आणण्यास कारणीभूत ठरले. पालिकेच्या राजकारणात तसेच सभागृहातील कामकाजात भोईर यांचा राष्ट्रवादीला निश्चितपणे फायदा होणार आहे. संजय वाबळे हे माजी आमदार विलास लांडे यांचे समर्थक मानले जातात. पालिका निवडणुकीत ते इंद्रायणीनगर प्रभागातून लढले आणि पराभूत झाले. वाबळे यांच्या भरवशावर विलास लांडे यांचा मुलगा विक्रांतला या प्रभागात उतरवण्यात आले होते. विक्रांत लांडे निवडून आले आणि वाबळे पराभूत झाले. सर्व बाजूने भक्कम असणारा नगरसेवक पराभूत झाल्याची हळहळ राष्ट्रवादीत होती. वाबळे यांचे सर्वपक्षीय संबंध, पूर्वनिष्ठा फळाला आली. दुसरे म्हणजे भोसरी विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून िपपरी पालिकेची सत्ता जाईल, असे राष्ट्रवादीत कोणाला वाटले नव्हते. त्यामुळे संधी मिळत असतानाही अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची धूळधाण उडाली आणि रथी-महारथी पराभूत झाले. उमेदवारी मिळालेले आणि न मिळालेले अनेक जण स्वीकृतच्या रांगेत होते, त्यांचा हिरमोड झाला. दोन सदस्य नेमके कोण असतील, यावरून बरेच तर्कवितर्क होत होते. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू होत्या. आकुर्डीतील नगरसेवक निलेश पांढारकर यांना संधी मिळेल, असे सुरूवातीचे वातावरण होते. निवडणूक प्रचाराच्या काळात तसा ‘शब्द’ अजित पवारांनी दिल्याचे दाखले दिले जात होते. सांगवीत प्रशांत शितोळे आणि थेरगावात झामाबाई बारणे यांची उमेदवारी कापणे, ही राष्ट्रवादीची घोडचूक होती. बारणे निवडून आल्या, तर शितोळे कडवी झुंज देत पराभूत झाले. सांगवी-पिंपळे गुरवच्या पट्टय़ात राष्ट्रवादीला तोंड वर करण्यासाठी जागा नसल्याने शितोळे यांची वर्णी लागेल, असा तर्क मांडला जात होता. मात्र, गंभीर आरोप असल्याने तिकीट कापलेल्या शितोळे यांना पुन्हा पक्षाचा टिळा लावण्याची जोखीम राष्ट्रवादीने पत्करली नाही. भाजपची ऑफर असतानाही प्रसाद शेट्टी राष्ट्रवादीत थांबले. त्यांना राष्ट्रवादीनेही उमेदवारी दिली नाही.

स्वीकृतचे गाजर त्यांना दाखवण्यात आले. मात्र, पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भोईर व वाबळे यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर प्रसाद शेट्टी यांचाही अपेक्षाभंग झाला.