पुणे : देशात आणि राज्यात ‘ई-नोटरी’ प्रणाली सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीकडून करण्यात आली. याबाबत संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे. विक्रम चव्हाण, अंकित तिवारी, अभिजित भोसले आदी या वेळी उपस्थित होते.
‘सध्या देशात आणि राज्यात असलेल्या पारंपरिक नोटरी प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पारंपरिक हस्तलिखित पद्धतीमुळे अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये चुका होणे, त्यांचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो. मात्र, नोटरी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात ‘ई-नोटरी’ प्रणालीद्वारे लागू केली, तर या त्रुटी टाळता येतील. नोटरीची व्यवस्था अधिक सुलभ, सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वसनीय होईल,’ असे गुप्ता यांनी सांगितले.
‘ई-नोटरी’ प्रणालीचे संभाव्य फायदे
– दस्तऐवजांचे डिजिटल स्वरूपात दीर्घकाळासाठी संग्रह करणे शक्य
– अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांची सुरक्षितपणे हाताळणी करणे साध्य होईल
– दस्तऐवजांमध्ये फसवणूक, छेडछाड किंवा दुरुपयोग टाळता येईल
– प्रत्येक नोटरीसाठी विशिष्ट क्रमांक असलेल्या केंद्रीकृत प्रणालीची अंमलबजावणी
– नागरिकांच्या वेळ आणि पैशांची बचत होईल
– ‘ई-गव्हर्नन्स’च्या उद्दिष्टांना अधिक चालना