आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे व्होट फॉर इंडिया या उपक्रमांतर्गत मतदारांना साहाय्य करणारे केंद्र सुरू केले जाणार असून पुण्यातील पहिल्या केंद्राचे उद्घाटन सोमवारी (१७ फेब्रुवारी)  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.
नातूबाग येथे नगरसेवक हेमंत रासने यांच्यातर्फे हे केंद्र सुरू केले जात आहे. याच कार्यक्रमात रासने यांच्या दोन वर्षांच्या कार्यअहवालाचे प्रकाशनही केले जाईल. व्होट फॉर इंडिया या उपक्रमात कॉल सेंटरच्या स्वरूपात एक केंद्र चालवले जाणार असून मतदानात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांना मदत मिळण्यासाठी या केंद्राचा उपयोग होईल. त्यासाठी १८००२३३०००४ हा नि:शुल्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला असून या क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदार यादीसह अन्य सर्व माहिती मिळवण्याची व्यवस्था या क्रमांकावर असेल.
मतदाराने या क्रमांकावर त्याचे नाव व पत्ता यांची माहिती दिली, तर दहा सेकंदांमध्ये त्या मतदाराला त्याचा मतदार यादीतील अनुक्रमांक तसेच मतदान केंद्र, खोली क्रमांक ही सर्व माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवली जाईल. या सेवेमुळे संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीत आहे वा नाही याचीही माहिती समजू शकेल. अनेक मतदार ऐनवेळी यादीचा शोध घेतात आणि त्यामुळे गोंधळ होतो. ते टाळण्यासाठी आधीच संपर्क साधल्यास संपूर्ण माहिती या नि:शुल्क क्रमांकावर मिळवता येईल, असे रासने यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp vinod tawde help center hemant rasane
First published on: 16-02-2014 at 03:10 IST